अजितदादा काही दिवस घरूनच काम करणार... - Ajitdada will be in isolation for a few days  he will work from home for a few days | Politics Marathi News - Sarkarnama

अजितदादा काही दिवस घरूनच काम करणार...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

 अजित पवार हे  पुढील काही दिवस ते विलगीकरणात राहणार आहेत. ते कार्यालयीन कामकाज घरुनच करणार आहेत. महत्वाच्या बैठकांना देखिल उपमुख्यमंत्री व्हीसीद्वारे उपस्थित असतील.  

मुंबई : राज्यातील कोट्यवधी जनतेच्या सदिच्छा, कार्यकर्त्यांची प्रार्थना तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, सपोर्ट स्टाफ यांच्या प्रयत्नांमुळे मी कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आज घरी परतलो आहे. माझी प्रकृती उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील आणखी काही दिवस घरीच विलगीकरणात राहणार आहे. माझ्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या हितचिंतकांचा मी मनापासून आभारी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेचे तसेच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. 26 ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्र्यांनी स्वत: ट्विट करुन त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने ते रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती दिली होती. सात दिवसांच्या उपचारानंतर आज उपमुख्यमंत्र्यांना घरी सोडण्यात आले असून पुढील काही दिवस ते विलगीकरणात राहणार आहेत. ते कार्यालयीन कामकाज घरुनच करणार आहेत. महत्वाच्या बैठकांना देखिल उपमुख्यमंत्री व्हीसीद्वारे उपस्थित असतील, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे.

अजित पवार यांना आज ब्रीच कँडी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दरम्यान त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले गेले. खासदार सुप्रिया सुळे यांनीच समाजमाध्यमावर या बाबत माहिती दिली आहे. सुरवातीला तापाचे निदान झाल्यानंतर अजित पवार यांनी तपासणी केली होती, ती निगेटीव्ह आली होती, त्या नंतर पुन्हा दुस-यांदा जेव्हा त्यांची चाचणी करण्यात आली, तेव्हा ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे लक्षात आले. त्यानंतर स्वतः पवार यांनीच या बाबत समाजमाध्यमावर माहिती दिली होती. आपल्या संपर्कातील लोकांनीही काळजी घेण्याचे आवाहन केले होते. 

खबरदारीचा उपाय म्हणून अजित पवार हे ब्रीच कँडीमध्ये दाखल झाले होते. त्या नंतर त्यांनी आराम केला. आज मात्र त्यांची प्रकृती उत्तम असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान अजित पवार पुन्हा दौरे केव्हा सुरु करणार हे अद्याप निश्चित नाही. काही दिवस ते घरी थांबूनच काम करतील, असे निकटवर्तियांकडून सांगितले गेले. उपमुख्यमंत्री कार्यालयाकडूनही अद्याप कोणतेही दौरे निश्चित झालेले नसल्याचे सांगितले गेले. 

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्य पाहणी दौ-यांनतर अजित पवार यांची टेस्ट निगेटीव्ह आली होती, पण नंतरच्या चाचणीत मात्र ते पॉझिटीव्ह आढळले होते. त्यांनी आपणहूनच काळजी घेण्याचे निश्चित करुन रुग्णालयात दाखल होणे पसंत केले. डॉक्टरांनीही त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख