पिंपरी : उद्योगनगरीतील उत्तर भारतीयांना गेल्या ४१ वर्षात प्रथमच नदीकिनारी व तलाव येथे यावर्षी छटपूजा करता येणार नाही. मुंबई महापालिकेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही सार्वजनिक ठिकाणी छटपूजेवर बंदी घातली आहे. त्यामुळे हा सण यावेळी घरातच साजरा करावा लागणार आहे.
पालिका आय़ुक्त श्रावण हर्डीकर यांनी छटपूजा बंदीचा हा आदेश जारी केला आहे. यावर्षी हा सण घरातच साजरा करा,असे आवाहनही त्यांनी केले आहे. दिवाळीनंतर हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने व्यापक जनहितास्तव सार्वजनिक ठिकाणच्या छटपूजेवर आजपासून (ता. १८) बंदी घालण्यात आल्याचे आयुक्तांनी बंदी आदेशात म्हटले आहे. परिणामी शहरातील पवना व इंद्रायणी नदीकिनारे व तलावांजवळ छटपूजेसाठी गर्दी होणार हे पोलिसांनी पहावे, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. खासगी जागेत सुद्धा हा उत्सव करताना सामाजिक अंतर राखण्यास (सोशल डिस्टंसिंग) बजावण्यात आले आहे.
फडणवीस यांनी सांगितल्या मुंबईतील मेट्रोच्या पडद्यामागच्या घडामोडी https://t.co/WlkZxlyOm2
— Sarkarnama (@SarkarnamaNews) November 18, 2020
दरम्यान, या निर्बंधाचे शहरातील उत्तर भारतियांनी स्वागत केले आहे. १९७९ पासून शहरात नदीकिनारी छटपूजेचे आय़ोजन करणाऱ्या हनुमान मित्र मंडळ संचालित छटपूजा समितीचे अध्यक्ष विजय गुप्ता यांनीही कोरोना काळात घेतलेला हा निर्णय़ जनहिताचा असल्याचे सांगितले. त्यामुळे समाजबांधवांनी घरातच यावेळी छटपूजा करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
आजपासून चार दिवसांचा हा उत्सव सुरु झाला. त्यात शेवटच्या दोन दिवशी पाण्यात उभे राहून सुख, शांततेसाठी प्रार्थना केली जाते, शहरात १९७९ पासून होणारी छटपूजा यावर्षी कोरोनाने प्रथमच खंडीत केली. दरम्यान, कोरोनामुळे इतर सर्व धार्मिक सण, उत्सव साधेपणानेच साजरे झाल्याने छटपूजेवरही बंधन येणार असल्याचे समजताच काही उत्तर भारतीय छटपूजेसाठी नुकतेच गावी गेले आहेत, असे गुप्ता म्हणाले. शहरात तीन ते साडेतीन लाख उत्तर भारतीय असल्याची माहिती त्यांनी दिली

