202 police deaths due to corona in the state till date | Sarkarnama

राज्यात आतापर्यंत 202 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

राज्यात गेल्या 24 तासांत आठ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : राज्यात गेल्या 24 तासांत आठ पोलिसांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. त्यात मुंबई व रत्नागिरी येथील दोन पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्य पोलिस दलातील मृतांचा आकडा 202 वर पोचला आहे. 

राज्यात गेल्या 24 तासांत आठ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबई व रत्नागिरीतील दोन अधिकाऱ्यांसह ठाणे शहर, नाशिक शहर, सांगली, जळगाव, नंदूरबार व उस्मानाबाद येथील प्रत्येकी एका पोलिसाचा समावेश आहे. राज्यातील ग्रामीण विभागामध्ये कोरोनामुळे पोलिसांचे मृत्यू चिंतेचा विषय ठरत आहे. 

बीड, कोल्हापूर, चंद्रपूर, बुलढाणा या जिल्ह्यांतही ऑगस्ट महिन्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अनेक पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याशिवाय राज्य राखीव पोलिस दलाच्या विविध तुकड्यांमध्येही ऑगस्ट महिन्यात पोलिसांचे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. याशिवाय 371 पोलिसांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 19 हजार 756 वर पोहोचला आहे. दरम्यान, राज्य पोलिस दलात सध्या तीन हजार 724 सक्रिय कोरोनाग्रस्त पोलिस आहेत. 

पिंपरी चिंचडमध्ये एका दिवसात 16 जणांचा मृत्यू 

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात मंगळवारी (ता. 15 सप्टेंबर) 997 जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे तपासणीत आढळून आले. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या 65 हजार 379 वर जाऊन पोचली आहे. 

पिंपरी चिंचवड शहरातील एक हजार 188 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे झालेल्या नागरिकांची संख्या 51 हजार 510 एवढी झाली आहे. 

दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन आज 16 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात पिंपरी चिंचवड शहरातील नऊ, तर शहराबाहेरील सात जणांचा समावेश आहे. शहरातील एकूण मृत्यूची संख्या एक हजार 65 एवढी झाली आहे. शहरात सध्या नऊ हजार 535 रुग्ण सक्रिय आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख