विरोधी सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपच्या आयटीचा कट    -  BJP IT plot to destabilize the opposition government | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

विरोधी सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपच्या आयटीचा कट   

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 ऑक्टोबर 2020

भारतीय जनता पक्षाचा सोशल मीडियाच्या माध्यमातून नवा दहशतवाद फोफावला आहे. हा लोकशाहीविरोधात कट आहे.

मुंबई : भारतीय जनता पक्षाचा सोशल मीडियाच्या माध्यमातून नवा दहशतवाद फोफावला आहे. हा लोकशाहीविरोधात कट आहे. या माध्यमातून समाजात अशांतता पसरवणे तसेच विरोधी पक्षीयांची सरकारे अस्थिर करणे असेही प्रकार होऊ शकतात. या नवदहशतवादाचे समूळ उच्चाटन करा, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात सावंत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त परमवीरसिंह यांची भेट घेतली. यावेळी पक्षप्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, रत्नाकरसिंह उपस्थित होते. या नवदहशतवाद बदनामी मोहिमेचा टविटरवरुन मिळालेला डेटा पुढील तपासासाठी पोलिसांकडे देण्यात आला. पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये या कंपन्यांची नावं, सोशल मीडियावरील खरी व फेक अकाऊंटसची माहिती आहे. यासंदर्भात चौकशी करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती सावंत यांनी दिली.

सावंत म्हणाले की, भाजपाने सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांची बदनामी करण्याची, त्यांची प्रतिमा मलीन करण्याची मोहीम पद्धतशीरपणे चालवण्याचा नवा ट्रेंड आणला आहे. हा नव दहशतवाद आहे. याच माध्यमातून रातोरात हजारो ट्विटर, फेसबुक अकाऊंट उघडून बदनामीची मोहीम राबवली जाते. सुशांतसिंह राजपूत प्रकरणातही याच रॅकेटचा वापर करण्यात आला आहे. या ट्विटचा सविस्तर तपशील पाहिल्यास ते सरकार विरोधात विचारपूर्वक नियोजित केलेले कट कारस्थान आहे.

या ट्विटच्या असामान्य पॅटर्ननुसार वापरकर्त्याने 3 महिन्यांत 40 हजार ट्वीट/पोस्ट केल्या. यातील बहुतांश ट्विटर हँडलने दर मिनिटाला २५ ट्विट्स केल्या. हे सर्व ट्विट सुशांतसिंह राजपूत संदर्भात करण्यात आले, त्यांचे हॅशटॅगही एकच आहेत. महाराष्ट्र पोलिस आणि महाराष्ट्र सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी काही व्यावसायिक एजन्सींच्या मार्फत हे करण्यात आल्याचे यावरून स्पष्ट होते, असेही सावंत म्हणाले.    

मुख्यमंत्री हे आपल्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात असून त्यासाठीच मुंबई पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत असे चित्र रंगवण्याचा या मोहिमेचा एकमेव उद्देश होता. गोबेल्स तंत्राची ही विकसित आवृत्ती असून त्यावर आरुढ होत भाजपाचे नेते कृत्रीम जनमत बनवत आहेत, हे अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे, असे सावंत म्हणाले.

पालघरमधील दोन साधूंच्या हत्या तसेच दिल्ली दंगली यावेळीदेखील हीच पद्धती वापरण्यात आली होती. भविष्यातही अशाच पद्धतीने समाजात अशांतता पसरवली जाऊ शकते. विरोधी पक्षांची सरकारे अस्थिर करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो, अशी भीतीही सावंत यांनी व्यक्त केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख