तमाशा पंढरीत फडमालक करणार उपोषण -   Tamasha Fadmalak Kalawant Mandal decides to go on a fast | Politics Marathi News - Sarkarnama

तमाशा पंढरीत फडमालक करणार उपोषण

रवींद्र पाटे
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती  ज्येष्ठ तमाशा फडमालक रघुवीर खेडकर यांनी दिली. 

नारायणगाव : राज्यातील तमाशा फडमालक व कलावंत यांच्या आर्थिक व अन्य समस्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २१ सप्टेंबर २०२० रोजी नारायणगाव येथील तमाशा पंढरीत विठाबाई नारायणगावकर यांच्या पुतळ्यासमोर महाराष्ट्र राज्य तमाशा फडमालक कलावंत मंडळाने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य तमाशा फडमालक कलावंत मंडळाचे अध्यक्ष, जेष्ठ तमाशा फडमालक रघुवीर खेडकर यांनी दिली. 

याबाबत खेडकर म्हणाले की राज्यात तंबूचे व हंगामी असे सुमारे १३० फडमालक व साडेचार हजार कलावंत आहेत. कोरोनामुळे मार्च महिन्यात लॅाकडाउनचा निर्णय घेण्यात आल्याने यात्रा जत्रांचे कार्यक्रम रद्द झाले. यामुळे तमाशाचे कार्यक्रम रद्द झाले. फडमालकांचा पूर्ण हंगाम वाया गेला. दरवर्षी विजयादशमीच्या महूर्तावर तंबूच्या तमाशासाठी अकरा फडमालक राज्याचा दौरा करून व्यवसाय करतात. यात्रा जत्रांचा हंगाम व तंबूचे तमाशे यावर फडमालकांचे आर्थिक चक्र सुरू राहते. मागील वर्षी तमाशाचे कार्यक्रम रद्द झाल्याने फडमालक कर्ज बाजारी झाले असून फडमालक व कलावंत यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 

उदरनिर्वाह करण्यासाठी फडमालक व कलावंत यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी राज्यातील विविध संघटनांनी राज्य सरकारकडे निवेदनाव्दारे केली होती. मात्र, अद्यापही सरकारने याकडे लक्ष दिले नाही. कोरोना संकट वाढत असल्याने या वर्षी सुद्धा विजयादशमीच्या महूर्तावर तंबूच्या तमाशाचे कार्यक्रम होण्याची शक्यता नाही. कर्जबाजारी पणामुळे फडमालक चिंतेत आहेत. फडमालक व कलावंत यांच्या समस्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खेडकर यांच्या नेतृत्वाखाली विठाबाई नारायणगावकर यांचे पुत्र व फडमालक कैलास, कन्या मालती इनामदार, नातू विशाल, महाराष्ट्र राज्य तमाशा फड मालक कलावंत विकास मंडळाचे सचिव मुसाभाई इनामदार, उपाध्यक्ष राजू बागुल, संजय महाडीक, शांताबाई संक्रापुरकर हे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. 

राज्यात तंबूचे तमाशे करणारे अकरा जेष्ठ फडमालक आहेत.हे फडमालक सुमारे दोन हजार कलावंत, चालक,बिगारी यांचा उदरनिर्वाह करण्याचे काम करतात. हंगाम वाया गेल्याने अकरा तंबूच्या फडमालकावर सुमारे नऊ कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे.
- रघुवीर खेडकर

हेही वाचा :  आरोग्य खात्याने 270 कोटी लूटले..प्रविण दरेकरांचा आरोप 

मुंबई : कोरोनाच्या काळात खासगी लॅबशी संगनमत करुन राज्याच्या आरोग्य खात्याने सुमारे 270 कोटी रुपयांची लूट केली आहे, असा गंभीर आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. अत्यंत स्वस्त दरात
कोरोना चाचण्या करण्याची सरकारी कंपन्यांची तयारी होती, पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून जास्त दर आकारणाऱ्या खासगी कंपन्यांना मोकळे रान दिले, असाही आरोप त्यांनी केला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख