#मराठा आरक्षण ; संभाजी राजे म्हणाले, "सरकारकडून मागे ज्या चुका झाल्या त्या पुन्हा होऊ नये.. 27 ला सुनावणी  -   Maratha reservation Sambhaji Raje said The mistakes made by the government should not happen again Hearing on 27th | Politics Marathi News - Sarkarnama

#मराठा आरक्षण ; संभाजी राजे म्हणाले, "सरकारकडून मागे ज्या चुका झाल्या त्या पुन्हा होऊ नये.. 27 ला सुनावणी 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारला 'नव्या जोमाने बाजू मांडावी, संपूर्ण मराठा समाज याकामी आपल्या पाठीमागे उभा राहील,' असे सांगितले आहे.

मुंबई : मराठा आरक्षणाची स्थगिती उठवण्याच्या प्रकरणावर 27 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. स्थगिती उठवण्याबाबत एक याचिका दाखल करण्यात आली आहे. मराठा समाजाचं या सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे. याबाबत खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारला 'नव्या जोमाने बाजू मांडावी, संपूर्ण मराठा समाज याकामी आपल्या पाठीमागे उभा राहील,' असे सांगितले आहे.
 
राज्यात काही दिवसात मराठा आरक्षणासंदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. मराठा समाजाचा याबाबत बैठकाही झाल्या आहेत. न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे.

याबाबत खासदार संभाजीराजे म्हणाले की आरक्षणाला जी तात्पुरती स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने दिली होती, तिचा पुनर्विचार करण्यासाठीची याचिका महाराष्ट्र शासन आणि समाजातील जागरूक बांधवांनी दाखल केली आहे. त्या संदर्भात सुनावणी होईल. ज्या न्यायमूर्तींनी स्थगिती दिली होती, पुन्हा त्यांच्याच बेंच समोर सुनावणी होणार आहे. 

मला आशा आहे, की न्यायदेवता न्याय करेल. मराठा समाज बांधवांचा गेल्या 40 वर्षांचा लढा सार्थकी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याच बरोबर, राज्य सरकारकडून मागे ज्या चुका झाल्या किंवा ज्या काही उणिवा राहिल्या त्या पुन्हा होऊ नये याची दक्षता घेण्याची गरज आहे.

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकण्यासाठी केंद्र सरकारनं कायद्यात बदल करावा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या कोल्हापूर मेळाव्यात करण्यात आली होती. इतकंच नाही, तर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर, ‘मराठ्यांची ताकद दिल्लीत दाखवू’ असा इशाराही सकल मराठा समाजाकडून देण्यात आला आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी सेवेत आरक्षण देणाऱ्या राज्य सरकारच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबरला अंतरिम स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठवण्यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलने आणि मोर्चे काढले जात आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख