शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त या कुस्तीगीरावर रडण्याची वेळ   - Time to cry over this Shivchhatrapati Sports Award winning wrestler | Politics Marathi News - Sarkarnama

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त या कुस्तीगीरावर रडण्याची वेळ  

संपत मोरे : सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 मे 2020

अवकाळी पावसामुळे शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मल्ल कौशल्या वाघ यांच्या कुस्तीसंकुलाचे बांधकाम पडले आहे.

पुणे : कोरोनामुळे यावर्षी कुस्ती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन यात्रेच्या हंगामात कोरोना आल्याने गावोगावची मैदाने रद्द झाली. पैलवानांचा हा मिळकतीचा काळ असतो. याच काळात त्याना चांगले पैसे मिळतात. पण कोरोना आड आला. कोरोनाचा कुस्तीवर असा परिणाम झाला असतानाच कोरोनाच्या काळात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मल्ल कौशल्या वाघ यांच्या कुस्तीसंकुलाचे बांधकाम पडले आहे. जीवाचे रान करून उभारत असलेल्या त्यांच्या कुस्तीकेंद्राचे बांधकाम पडल्याने कुस्तीच्या आखाड्यात लढणाऱ्या एका महिला कुस्तीगीरावर रडण्याची वेळ आलीय.

कडेगाव तालुक्यातील रायगाव येथील कौशल्या वाघ यांनी कुस्ती क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. घरची गरिबी असताना तिने कुस्तीत यश मिळवले. तिचे वडील मुंबईत अंगमेहनतीची काम करायचे, पण त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःच्या मुलीला पैलवान बनवले. या मुलीने काही काळातच कुस्तीत चांगले नाव कमावले. राज्य आणि देशपातळीवरची बक्षिसे मिळवली. बबिता फोगटसोबत सुद्धा तिची लढत झाली होती. तिच्या कुस्तीतील कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र सरकारने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन तिचा गौरव केला.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपण यश मिळवले. पण तो संघर्ष इतर मुलींच्या वाट्याला येऊ नये आणि ग्रामीण भागातील कुस्तीत येणाऱ्या मुलींना प्रशिक्षण मिळावे म्हणून कौशल्या वाघ हिने तिच्या रायगाव या गावात कुस्तीकेंद्र उभा करण्याचा निर्धार केला. तिच्या या निर्धारास कृषिराज्यमंत्री डॉ विश्वजित कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण लाड यांनी मदत केली. कौशल्या हिने स्वतःचे दागिने गहाण ठेवले. रक्कम कमी पडली म्हणून कर्ज काढले आणि गावात संकुल उभा करायला सुरुवात केली. महाराष्ट्रात एका महिला कुस्तीगिराने उभारलेले हे पहिले कुस्ती केंद्र आहे. ते उभा राहत असतानाच आलेल्या अवकाळी पावसामुळे बरेच बांधकाम पडले आहे. प्रतिकूल परिस्थितीत उभारलेल्या या बांधकामाला अवकाळी पावसाचा झटका बसला आहे.

कुस्ती संकुल उभं करावं एवढी माझी आर्थिक परिस्थिती नाही मात्र, ग्रामीण भागात महिला कुस्ती वाढावी या हेतूने मी हे कुस्ती संकुल उभारत आहे. मी पूर्वी आर्थिक परिस्थितीवर मात करत होते. आता निसर्गही माझ्या आडवा आला आहे. त्यावर जिद्दीने मी मात करेन. मी संकुल उभा करेन फक्त माझ्या पाठीशी समाजातील कुस्तीप्रेमींनी उभं राहिलं पाहिजे. 
कौशल्या वाघ,
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त पैलवान

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख