धक्कादायक बातमी ; राज्यात फक्त आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा - Shocking news; Only eight days of blood supply in the state | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक बातमी ; राज्यात फक्त आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा

संपत मोरे 
गुरुवार, 21 मे 2020

आपल्या जवळच्या ब्लड बँकेत, रुग्णालयात किंवा आपल्या सोसायटीत रक्तदान शिबीर घेऊन रक्तदान करा.

पुणे : "राज्यात आठ ते दहा दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी पुढे यावे," असे आवाहन अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी गुरूवारी केले आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी गुरूवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यादरम्यान त्यांनी राज्यातील रक्ताच्या साठ्याच्या स्थितीची माहिती दिली. "राज्यात आठ ते दहा दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी पुढे यावे." असे ते म्हणाले.

"कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करताना रक्ताची गरज नसते मात्र, त्या व्यक्तीला जर ऍनिमिया, किंवा इतर आजार असतील तर अशा परिस्थितीत त्यांना रक्ताची आवश्यकता भासू शकते. ऑपरेशन, बाळंतपण, कॅन्सर यावर उपचार करण्यासाठी रक्ताची गरज असते. त्यामुळे रक्तदानाची गरज आहे."

"आपल्या जवळच्या ब्लड बँकेत, रुग्णालयात किंवा आपल्या सोसायटीत रक्तदान शिबीर घेऊन रक्तदान करावे, " असे आवाहन डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले. रक्तदान करणाऱ्यांची सुरक्षितता राखून छोटे रक्तदान शिबीर घेण्याची गरज आहे, असे डॉ शिंगणे म्हणाले. या बैठकीस अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. अरुण उन्हाळे, हाफकीनचे कार्यकारी संचालक राजेश देशमुख उपस्थित होते.

 
आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा : राज्यपाल

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहेत. जून, जुलै महिन्यातील कोरोनाच्या प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर सज्ज राहण्याची सूचना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिली. कोरोनाबाबत राज्याच्या विविध विभागाच्या पूर्व तयारीचा एका उच्च स्तरीय बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी या सूचना राज्यपाल कोश्यारी यांनी दिल्या. येत्या जून व जूलै महिन्यातील कोरोना बाधितांची संभाव्य संख्या विचारात घेऊन संपूर्ण राज्यात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली.कोरोना संकटाचा मुकाबला करताना बिगर कोरोना रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली.मुंबईतील कंटेनमेंट क्षेत्रासाठी काय उपाय योजना करीत आहे, याची राज्यपालांनी संबधित विभागांकडून माहिती घेतली.राज्यात एकूण वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, आरोग्य सेवक, रूग्णालयातील उपलब्ध खाटा यांची एकत्रित माहिती देणारा डॅशबोर्ड तयार करण्याची राज्यपालांनी यावेळी सूचना केली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख