कोट्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी 'धुळे पॅटर्न' : एसटीच्या ७० बसेस रवाना - Seventy Buses Sent to Kota City to Bring Back Stranded Students | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत होणार

कोट्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी 'धुळे पॅटर्न' : एसटीच्या ७० बसेस रवाना

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 30 एप्रिल 2020

ज्यात शिक्षणाचा जसा लातूर पॅटर्न तयार झाला होता. तसाच राजस्थानमधील कोटा पॅटर्न शैक्षणिक क्षेत्रात प्रसिध्द आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षांची तयारी तेथे करून घेतली जाते. या शिक्षणासाठी महाराष्ट्रातून दरवर्षी हजारो विद्यार्थी कोटा (राजस्थान) येथे जातात

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात देशभरात संचारबंदी लागू असल्याने तसेच राज्यातही जिल्हाबंदी असल्याने कोणालाही पूर्वपरवानगीशिवाय परजिल्ह्यात जाता येत नाही. अशा परिस्थितीत राजस्थान येथील कोटा शहरात अडकलेल्या दीड हजार विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी एसटी महामंडळाच्या धुळे आगारातून ७० बसेस रवाना झाल्या आहेत. दोन दिवसांत या बस विद्यार्थ्यांना घेवून माघारी येतील, असे सांगितले जात आहे.

लातूर पॅटर्न सारखा कोटा पॅटर्न प्रसिद्ध

राज्यात शिक्षणाचा जसा लातूर पॅटर्न तयार झाला होता. तसाच राजस्थानमधील कोटा पॅटर्न शैक्षणिक क्षेत्रात प्रसिध्द आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षांची तयारी तेथे करून घेतली जाते. या शिक्षणासाठी महाराष्ट्रातून दरवर्षी हजारो विद्यार्थी कोटा (राजस्थान) येथे जातात.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दळण-वळणाची साधने बंद झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे दीड हजारांवर विद्यार्थी कोटामध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना माघारी आणण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालकांनी शासनास विनंती केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, परिवहन मंत्री डॉ. अनिल परब यांनी केंद्र सरकार व राजस्थान सरकारशी चर्चा करुन, कोटा येथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी यशस्वी बोलणी केली.

सॅनिडाईझ करुन बसेस केल्या रवाना

या साठी नियोजन करून सरकारने महसुल राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी परिवहनमंत्री यांच्याशी चर्चा करुन, धुळे जिल्ह्यातील 70 बसेस उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शविली. काल त्याची अंमलबजावणी झाली. त्यानुसार काल धुळे येथून सत्तर बसेस कोटाकडे रवाना झाल्या. मंत्री अब्दुल सत्तार यांनी यांनी आवश्‍यक ती पावले उचलून तातडीने सत्तर बसेस सॅनिटायझ करुन व बसेसमध्ये आवश्‍यक त्या सुविधा व वाहनचालकांसह रवाना केल्या आहेत.

प्रत्येक बसवर दोन चालक

धुळे ते कोटा हे 630 किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे प्रत्येक बसवर दोन चालकांची नियुक्ती केली आहे. या चालकांना स्वसंरक्षणासाठी परिवहन महामंडळाने आवश्‍यक साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. त्यात मास्क, सॅनिटायझरचा समावेश आहे. तत्पूर्वी सर्व बस सॅनिटायझ करण्यात आल्या. या बस मंदसौर, रतलाममार्गे कोटा (राजस्थान) येथे पोहोचतील. व त्यानंतर त्या राज्यातील विद्यार्थ्यांना धुळे येथे आणण्यात येईल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख