तमिळनाडूत अडकलेल्यांची उद्धव ठाकरे, छगन भुजबळांना हाक.... साहेब, आम्हाला घरी येऊ द्या! - Railway Apprentice Stranded in Karnataka Appealing for Coming back in Maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

तमिळनाडूत अडकलेल्यांची उद्धव ठाकरे, छगन भुजबळांना हाक.... साहेब, आम्हाला घरी येऊ द्या!

अमोल खरे
शनिवार, 9 मे 2020

रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी कालावधीत अनुभवासाठी गेलेले राज्यातील ३८२ प्रशिक्षणार्थी तामिळनाडू, कर्नाटक राज्यात लॉकडाउनमुळे अडकले आहेत. नाशिक जिल्ह्यासह सबंध महाराष्ट्रातील मुलांनी राज्य शासनासह अन्न व नागीर पुरवठा मंत्री छगन छगन भुजबळ यांना 'आम्हाला घरी यायचे आहे', अशी साद घातली आहे. 

मनमाड :  रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी कालावधीत अनुभवासाठी गेलेले राज्यातील ३८२ प्रशिक्षणार्थी तमिळनाडू, कर्नाटक राज्यात लॉकडाउनमुळे अडकले आहेत. त्यांची तेथे गैरसोय होत आहे. प्रशिक्षणार्थी घरी येण्यासाठी तेथील प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यांना केवळ आश्‍वासने मिळत असल्याने विद्यार्थी चिंतीत झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील मुलांनी राज्य शासनासह अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन छगन भुजबळ यांना 'आम्हाला घरी यायचे आहे', अशी भावनिक साद घातली आहे. रेल्वेचे प्रशिक्षणार्थी म्हणून नाशिक जिल्ह्यासह राज्यातील ३८२ विद्यार्थी लॉकडाऊनमुळे तमिळनाडू, कर्नाटक येथे अडकून पडले आहेत. तमिळनाडूच्या मेहुपालियम शहरात १६५, इरोड शहरात १६७ तर कर्नाटकातील मंगळुरू येथे ५० प्रशिक्षणार्थी अडकून पडले आहेत. 

लॉकडाऊन सुरू झाल्यावर प्रशिक्षणार्थी कालावधी संपला आहे. मात्र संचारबंदी असल्याने मोठी गैरसोय होत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे पालकांची चिंता अधिकच वाढली आहे. आपल्या राज्यात जाण्यासाठी मोबाईल वर आलेले ऑनलाइन फॉर्म आम्ही भरले आहे. मात्र अद्यापही हालचाल झालेली नाही. परंतु इतर राज्यांतील येथील मुलांना गाड्यांमधून त्यांच्यां राज्यात नेले जात आहे. यामुळे आम्ही महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी एकाकी पडली असल्याचे या मुलांनी सांगितले. 

''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कळकळीची विनंती आहे भुजबळ साहेब आम्हाला आमच्या घरी यायचे आहे साहेब घरी आल्यावर आम्ही विद्यार्थी आपापल्या घरात क्वारंटाईन करून घेऊ,'' असे मनमाडचा पवन निरभवणे यांने सांगितले. येथील प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा सुरू असून केवळ आश्वासनेच मिळत असल्याचे या विद्यार्थाने सांगितले. 

मेहुपालियम शहरात अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मनमाडचे २५, नाशिक ८, जळगाव ८१, बुलढाणा ७, नागपूर १, कोल्हापूर १, सोलापूर १, अमरावती ६, अकोला १०, बीड ३, चंद्रपूर ८, नांदेड ६, गोंदिया १, वर्धा १, वाशीम १, भंडारा ५, असे एकूण १६५ विद्यार्थी. इरोड शहरात मनमाडचे १३, नाशिक ८, जळगाव ९३, बुलढाणा ७, नागपूर २, कोल्हापूर १, सोलापूर १, अमरावती ६, अकोला १०, बीड २, चंद्रपूर ८, नांदेड ६, गोंदिया १, वर्धा १, वाशीम १, भंडारा ७, असे एकूण १६७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

कर्नाटकातील मंगळुरु शहरात मनमाडचे १० विद्यार्थी जळगाव ३५ व मालेगावचे ५ असे विद्यार्थी आहेत. लॉकडाउन जाहीर झाल्यापासून म्हणजे दोन महिने होत आले आम्ही तमिळनाडू मध्ये अडकलो आहेत. प्रशासनाने तत्काळ विचार करून आमची सोडवणूक करावी. आमचे कुटुंब काळजीत आहे. आमची सहनशक्ती संपत आहे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ साहेब यांना विनंती आहे आम्हाला घरी यायचे आहे - पवन निरभवणे, प्रशिक्षणार्थी, मनमाड. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख