'सारथी'चा तारादूत प्रकल्प सुरु ठेवा : आमदार सतीश चव्हाण यांची मागणी - MLA Satish Chavan Want SAARATHI's Taradoot Project To Be Continued | Politics Marathi News - Sarkarnama

'सारथी'चा तारादूत प्रकल्प सुरु ठेवा : आमदार सतीश चव्हाण यांची मागणी

संपत मोरे
मंगळवार, 7 जुलै 2020

सारथी मार्फत तारादूतांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा आदेश मागे घेऊन तारादूत प्रकल्प सुरूच ठेवावा, अशी विनंती आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांना आमदार सतीश चव्हाण यांनी पत्र पाठवून तारादूतांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे.

पुणे : "सारथी मार्फत तारादूतांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा आदेश मागे घेऊन तारादूत प्रकल्प सुरूच ठेवावा, "अशी विनंती आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांना आमदार सतीश चव्हाण यांनी पत्र पाठवून तारादूतांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे.

"शासनाच्या तसेच सारथीच्या विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या (सारथी) वतीने डिसेंबर २०१९ रोजी तारादूत प्रकल्प सुरू करण्यात आला. या अंतर्गत ३५५ तारादूतांची परिश्रमिक (मानधन) तत्वावर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या (सारथी) वतीने २७ मे २०२० रोजी तारादूत म्हणून सारथी मार्फत परीश्रमिक (मानधन)  तत्वावर करार पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपातील घेण्यात आलेल्या तारादूतांच्या नियुक्‍त्या रद्द करण्याचे आदेश दिले आहेत,'' असे सतीश चव्हाण यांनी मंत्री वडेट्टीवार यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

तारादूत म्हणून निवड झाल्याने अनेकांनी हातातील नोकरी सोडली. मागील चार महिन्यांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लाॅकडाऊन असल्याने तारादूतांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक तारादूतांवर कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यात त्यांच्या नियुक्त्या रद्द झाल्याने 'आम्ही जगायचे कसे?' असा प्रश्न तारादूतांकडून उपस्थित होत आहे. या करिता सदरील बाबीचा गांभीर्यपूर्वक विचार करून सारथी मार्फत तारादूतांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा आदेश मागे घेऊन तारादूत प्रकल्प सुरूच ठेवावा."अशी या पत्रात करण्यात आली आहे.

सारथीचा आत्मा तारादूत आहे.सारथी गावागावात पोहोचली ती तारादूतांच्यामुळे. कोट्यवधी रुपयांच्या जाहीराती देऊन शक्य झाले नसते ते काम आम्ही केले, मात्र राज्य सरकारने आमची फसवणूक केली आहे.सारथीसाठी आम्ही खूप कष्ट केले आहे. तारादूतांनी तीन महिने काम केले मात्र एका महिन्याचा पगार दिला आहे. दुसऱ्या महिन्याचा पगार हवा असेल तर राजीनामे द्या आणि ओळखपत्र सरकारकडे जमा करा असे सांगण्यात आले. सारथीचा आत्मा तारादूत आहे मात्र तोच काढून घेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.  मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जे विधान केले आहे ते दुर्दैवी आहे."-सदाशिव भुतेक, तारादूत 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख