'यूजीसी'च्या 'स्वंय'कडे विद्यापीठांनी फिरवली पाठ... - Ignoring online education by universities and institutes | Politics Marathi News - Sarkarnama

'यूजीसी'च्या 'स्वंय'कडे विद्यापीठांनी फिरवली पाठ...

ब्रिजमोहन पाटील 
सोमवार, 1 जून 2020

चार वर्षापूर्वी 'यूजीसी'ने आॅनलाईन अभ्यासक्रमाबाबत विद्यापीठ, संस्थांना सूचना केल्या होत्या. त्याकडे विद्यापीठ व संस्थांनी पाठ फिरवल्याने हे आॅनलाईन शिक्षण दुर्लक्षित राहिले आहे.  

पुणे : 'कोरोना'मुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्था ठप्प झाली आहे, परीक्षा रद्द झाल्या, शाळा, महाविद्यालयांना टाळे लागलेले आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शैक्षणिक संकुल पुन्हा कधी गजबजतील याबाबत शाश्वती नाही. अशा काळात आॅनलाईन शिक्षणाचा मार्ग निवडला जात आहे.

सध्या विद्यार्थ्यांचे 'झूम'द्वारे क्लास, पीपीटी, पीडीएफ द्वारे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, प्राध्यापकांनी व्हिडिओ तयार केले करून ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र, चार वर्षापूर्वी 'यूजीसी'ने आॅनलाईन अभ्यासक्रमाबाबत विद्यापीठ, संस्थांना सूचना केल्या होत्या. त्याकडे विद्यापीठ व संस्थांनी पाठ फिरवल्याने हे आॅनलाईन शिक्षण दुर्लक्षित राहिले आहे.   

'यूजीसी'ने 2016 मध्ये परिपत्रक काढून 'स्वयं' हे पोर्टल उपलब्ध करून दिले होते. उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाच्या वापराने बदल आवश्यक असल्याने 'स्वंय'च्या माध्यमातून अनेक अभ्यासक्रम आॅनलाइन करण्यात आले होते. पण काही व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता अन्य अभ्यासक्रमांकडे विद्यापीठ, शिक्षण संस्थांनी पाठ फिरवली होती. या 'डिजीटल शिक्षणा'साठी किमान 20 टक्के क्रेडीट ट्रान्सफर हे 'इ कंटेंट'च्या माध्यमातून व्हावे यासाठी 'स्वयं' वरून आॅनलाईन शिक्षणाचे धडे घ्यावेत, पदवीसाठी आवश्यक असलेले 2 हजार पेक्षा जास्त पुरक कार्स उपलब्ध केले. मात्र, याकडे महाविद्यालयांनी दूर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांनी 'क्रेडीट टान्सफर'साठी आॅनलाईन शिक्षण घेतले नाही. सध्याच्या कोराना संकटामुळे शिक्षण व्यवस्था ठप्प झाली आहे. ती सुरळीत व्हायला वेळ लागेल, त्यामुळे येत्या काळात 'स्वयं'वरील आॅनलाईन अभ्यासक्रमात सहभाग वाढवणे आवश्यक होणार आहे.

पुणे विद्यापीठात काम सुरू

आॅनलाईन शिक्षणाची गरज अधोरेखीत झाल्यानंतर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यादृष्टीने पाऊल उचलण्यास सुरूवात केली आहे. पुणे विद्यापीठाने 'स्वयं', 'इ-पाठशाळा' यांच्या धर्तीवर किमान 40 टक्के अभ्यासक्रम आॅनलाईन करण्यासाठी काम सुरू झाले आहे. त्यासाठी प्राध्यापकांना विद्यापीठातील 'इएमआरसी', 'इ कंटेंट डेव्हलपमेंट स्टुडिओ' चा वापर करता येणार आहे.

'यूजीसी'ने 2016 मध्ये आॅनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पुणे विद्यापीठातील काही विभागांनी 'स्वयं'वरून 20 टक्के 'क्रेडिट टान्सफर'साठी अभ्यासक्रम घेतले आहेत. यादृष्टीने महाविद्यालय स्तरावर याबाबत काम सुरू आहे.  
डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, पुणे विद्यापीठ

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख