समाजापासून एकटे पडल्याची भावना ; कोराना काही जाईना, मानसिक आरोग्यावर परिणाम

माझी आर्थिक कमाई पूर्वीसारखी राहील का आता.. हे कर्ज कसे फेडू.. हप्ते भरता येतील का... या काळजीत अनेक जण दुर्दैवाने बुडाले आहेत
Depression
Depression

नाशिक : कोरोनाच्या महामारीत घरात बसून असलेल्यांमध्ये काय होईल, कसं होईल, सर्व नियोजन बरोबर होईल की नाही, माझ्याकडे साठवून ठेवलेला पैसा पुरेसा होईल की नाही, अशा विविध कारणांमुळे अतिविचार, चिंता, काळजी, अस्वस्थपणा, बेचैनी वाढीस लागत आहे. हे चित्र पाहता आगामी दिवसात विविध प्रकारच्या मानसिक समस्या वाढतील, असं चित्र निर्माण होऊ पाहत आहे.

काही जणांच्या जेवण जात नसून काही जणांची झोप उडाली आहे... काही जणांच्या शारीरिक प्रकृतीवर परिणाम तर काही जणांचे मानसिक स्वास्थ्य खराब होत आहे. तात्पुरती नोकरी असलेल्यांना नोकरी कधी जाईल, याची डोक्‍यावर टांगती तलवार. कामवाल्या बाईला काळजी सोशल डिस्टन्सिंगमुळे मला कामावर यायला नाही सांगितलं आहे, मग माझ्या पगाराचं काय. मध्यमवर्गीय माणसाने कोणी नवीन घर घेतलं आहे, कोणी नवीन गाडी, कोणी नवीन ऑफिस. माझी आर्थिक कमाई पूर्वीसारखी राहील का आता.. हे कर्ज कसे फेडू.. हप्ते भरता येतील का... या काळजीत अनेक जण दुर्दैवाने बुडाले आहेत तर काही जण बुडत आहेत.

काय आहे शक्‍यता व चित्र

  1.  उदासीनता, नैराश्‍य, दडपण येणे, आत्मविश्वास कमी होणे, झोप कमी लागणे अशा काही लक्षणांच्या माध्यमातून डिप्रेशनचे प्रमाण वाढणार.
  2.  समाजात दारू/अल्कोहोलमुळे मानसिक ताणतणाव कमी होतो, या गैरसमजामुळे अनेक जण जास्त प्रमाणात व्यसनाकडे वळण्याची शक्‍यता.
  3.  डिप्रेशन आणि व्यसनाधिनता वाढल्यामुळे आत्महत्या आणि आत्महत्येचे प्रयत्न वाढण्याचा धोका
  4. लॉकडाउन नंतरही कोरोना राहणार आहे हे आता अनेकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात पूर्वीसारखे बाहेर फिरायला जाणे, चित्रपट, मॉल हे प्रकार पूर्वीच्या तुलनेत कमी होणार आहेत. त्यामुळे कदाचित अनेक जण, विशेषतः तरुण पिढी गॅजेट्‌स म्हणजे मोबाइल-टीव्ही यांच्या आहारी जाण्याची भीती.
  5.  एकटेपणा, संभाषणाचा अभाव,  नैराश्‍यात वाढ
  6.  आर्थिक विवंचनेमुळे अनेक मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना कदाचित आवश्‍यक ते उपचार घेता येणार नाहीत. त्यामुळे पूर्वी नियमित उपचार घेणाऱ्या अनेक गरजू रुग्णांमध्ये उपचाराअभावी स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसॉर्डर सारखे मानसिक आजार वाढण्याचा धोका.


काय करावे

  1. अनावश्‍यक गरजा, खर्चांना आतापासूनच कात्री
  2. आर्थिक नियोजन व्यवस्थित होत नाही तोपर्यंत नवीन खरेदीला विराम
  3.  म्युच्युअल फंड, एफडी, शेअर्समधोल बचतीला हात न लावणे बरे
  4.  परिस्थिती मान्य करीत स्वतःला धीर देणे, संयम ठेवणे गरजेचे
  5.  मी काय विधायक सकारात्मक काम करू शकते हे स्वतःला विचारा.
  6.  शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य या तीन गोष्टींना महत्व द्या
  7.  वेळेवर जेवणे, झोपणे, पुरेशी झोप घेणे, व्यसनांपासून दूर राहणे, नियमितपणे व्यायाम करणे, झिंक विटामिन सी सारखी पोषक तत्वांचा नियमित अवलंब 

चीनमध्ये एका संशोधनातून मिळालेली माहिती अशी:
डिप्रेशन :48 टक्के
चिंतारोग : 22 टक्के
डिप्रेशन आणि चिंता रोग : 19 टक्के
सोशल मीडियाचा अतिरिक्त प्रमाणात वापर : 86 टक्के

नक्की किती प्रमाणात हे मानसिक आजार वाढत आहेत किंवा वाढतील हे आज लगेच सांगणे कठीण आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (मुंबई) यांनी कोरोना आणि लॉकडाउनचे आपल्या सर्वांच्या मानसिक आरोग्यावर कसे परिणाम होतील याचा अभ्यास करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण संशोधन हाती घेतले आहे. अमेरिकेत नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात 48 टक्के लोकांनी कोरोना आल्यापासून मानसिक स्वास्थ्य खालावलं असल्याची माहिती दिली आहे. यात नोकरी जाण्याची भीती तसेच समाजापासून एकटे पडल्याची भावना ही दोन महत्त्वाची कारणं अधोरेखित करण्यात आली आहेत.

- डॉ. हेमंत सोनानीस
मानसोपचार तज्ज्ञ, नाशिक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com