'Dr. Srikant Jichkar Leaders Fellowship 'scheme announced | Sarkarnama

'या' पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळणार मंत्र्यासोबत कामांची संधी... 

उमेश घोंगडे : सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 3 जून 2020

काँग्रेसचे दिवंगत नेते 'डॉ. श्रीकांत जिचकार लिडर्स फेलोशिप' योजना महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसने जाहीर केली आहे.

पुणे  : राजकीय कार्यकर्त्यांना प्रशासकीय व राजकीय कामांचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी काँग्रेसचे दिवंगत नेते 'डॉ. श्रीकांत जिचकार लिडर्स फेलोशिप' योजना महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसने जाहीर केली आहे. डॉ. जिचकार यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक काँगेसने मंगळवारी या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. येत्या एक डिसेंबरपासून ही योजना प्रत्यक्षात येणार असल्याचे प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

डॉ. जिचकार हे अष्टपैलू आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे व्यक्तिमत्त्व होते. विविध क्षेत्रांत त्यांनी लोकोपयोगी कामे केली आहेत. एलएलबी व एलएलएम या विधी शाखेच्या पदव्यांबरोबरच इतर अनेक अभ्यासक्रम पूर्ण केले होते. त्यांच ‘आयएएस’ तसेच ‘आयपीएस’ सेवेसाठी निवड झाली होती. मात्र, त्यांनी राजकाणात प्रवेश करून आमदार, खासदार व मंत्री म्हणूनही अनेक वर्षे काम केले. कॉंग्रेसच्या बुद्धीमान व कतृर्त्ववान नेत्याच्या नावाने युवक कॉंग्रेसने राजकारणात येणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांसाठी चांगली योजना जाहीर केली आहे. युवकांना प्रशासकीय व राजकीय कामांचा अनुभव यावा, त्यातून नवनवीन तरुण राजकारणात व प्रशासकीय कामात पुढे यावेत या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. 

ही योजना सर्वांसाठी खुली असून वय वर्षे 21 ते 30 या वयोगटातील युवक नोंदणी करू शकतात. या फेलोशिप अंतर्गत काँग्रेसच्या मंत्र्यासोबत युवकांना सहा महिने काम करण्याची संधी मिळेल. पुढील ४ वर्षात एकूण 288 तरुण/तरुणींना फेलोशिप देण्याची योजना आहे. यासाठी नोंदणी सुरू झाल्याचे युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष तांबे यांनी सांगितले. प्रदेश युवक काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडल्सवर ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेसाठी लिंक उपलब्ध असून 15 जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना एक डिसेंबरपासून काम करण्याची संधी मिळेल. महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सरचिटणीस व प्रवक्त्या रिशिका राका व सोशल मीडिया राज्य समन्वयक प्रविणकुमार बिरादार या कार्यक्रमाचे समन्वयाचे काम पाहतील.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने सातत्याने नवनवीन तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांच्यातील नेतृत्वगुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. मागील दीड वर्षांत ‘वेक अप महाराष्ट्र’ , ‘सुपर 60‘, ‘युवा जोडो अभियान’ अशा विविध कार्यक्रमातून सामान्य कुटुंबातील युवकांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी युवक काँग्रेसने सातत्याने प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून डॉ श्रीकांत जिचकर लीडर्स फेलोशिप योजना जाहीर केली आहे.

सत्यजीत तांबे, प्रदेशाध्यक्ष, युवक कॅाग्रेस 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख