ज्येष्ठ तमाशा कलावंत, लोककलेची महाराणी कांताबाई सातारकर यांचे निधन 

कांताबाई या मूळच्या सातारा जिल्ह्यातील असल्याने कांताबाई सातारकर या नावाने त्या परिचित होत्या.
Veteran Tamasha artiste, Kantabai Satarkar passed away
Veteran Tamasha artiste, Kantabai Satarkar passed away

नारायणगाव : जुन्या पिढीतील तमाशा कलावंत व कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर या तमाशा फडाच्या संस्थापिका कांताबाई तुकाराम खेडकर-सातारकर (वय ८५) यांचे आज (ता. २५ मे) सायंकाळी संगमनेर येथे वृद्धपकाळाने निधन झाले. कांताबाई या मूळच्या सातारा जिल्ह्यातील असल्याने कांताबाई सातारकर या नावाने त्या परिचित होत्या. (Veteran Tamasha artiste, Kantabai Satarkar passed away)

तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांच्या तमाशात त्या गायिका व नृत्यांगना म्हणून काम करत होत्या. शाहीर पोवाडा गायनात त्यांचा विशेष नावलौकिक होता. फडमालक (स्व.) तुकाराम खेडकर यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला. आघाडीचे फडमालक रघुवीर खेडकर हे त्यांचे पुत्र असून प्रख्यात तमाशा कलावंत मंदा, अलका व बेबी या त्यांच्या कन्या आहेत.

तुकाराम खेडकर यांचे निधन झाल्यानंतर १९७० च्या सुमारास अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर या नावाने तमाशा फड सुरू केला. राज्यातील आघाडीच्या फडात या तमाशाची गणना होते. वयाच्या ७० वर्षांपर्यत त्या त्यांच्या स्वतःच्या तमाशात काम करत होत्या. तमाशाच्या माध्यमातून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, लोक शिक्षणातून जनजागृत करण्याचे काम केले. 

त्यांनी साकारलेली कोंढण्यावर स्वारी, विशाळगडची राणी, रायगडची राणी, पाच तोफांची सलामी, क्रांतिसिंह नाना पाटील ही ऐतिहासिक वगनाट्य व कोर्टाच्या दारी फुटला चुडा, का माणूस झाला सैतान, असे पुढारी आमचे वैरी ही समाजिक वगनाट्येही विशेष गाजली. कोंढण्यावर स्वारी या वागनाट्यात त्यांनी साकारलेली जिजामातेची भूमिका विशेष गाजली. या भूमिकेबद्दल माजी मुख्यमंत्री (स्व.) यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना सन्मानित केले होते. महाराष्ट्र सरकारच्या वतीने (स्व.) विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

कांताबाई सातारकर ह्या नृत्य, अभिनय, गायन या कलेत पारंगत होत्या. एकाच वागनाट्यात त्या पुरुष व स्त्री भूमिका साकारत होत्या. लोक कलेची महाराणी म्हणून त्या परिचित होत्या. त्यांच्या निधनामुळे कलावंत आईच्या मायेला पोरके झाले असून तमाशा सृष्टीतील एक तारा निखळला आहे, अशा शब्दांत अखिल भारतीय तमाशा परिषदेचे कार्याध्यक्ष संभाजी जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com