एकाच भेटीत विलासराव देशमुखांनी केली शिवछत्रपती पुस्तकातील चुकांची दुरुस्ती  - In one visit, Vilasrao Deshmukh corrected the mistakes in the book Shivchhatrapati | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

एकाच भेटीत विलासराव देशमुखांनी केली शिवछत्रपती पुस्तकातील चुकांची दुरुस्ती 

संतोष शेंडकर
बुधवार, 26 मे 2021

उदयनराजे, विलासराव देशमुख आणि आम्ही त्या पुस्तकावर सुमारे एक तास चर्चा केली.

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : इयत्ता चौथीच्या ‘शिवछत्रपती’ (Shivchhatrapati) पुस्तकाद्वारे शिवरायांबाबतच्या (Shivaji Maharaj) बऱ्याच अनैतिहासिक आणि बदनामीकारक गोष्टी तीस वर्षे शिकविल्या जात होत्या. 2005 मध्ये अशा 63 चुका तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यांनी एक तास गंभीरपणे ऐकून घेतले आणि त्या एकाच भेटीनंतर तत्कालीन शिक्षणमंत्री वसंत पुरके (Vasant Purke) यांना त्यांनी सूचना दिल्या. पुढे कमिटी नेमून त्या चुका दुरुस्त करण्यात आल्या. म्हणूनच शिवरायांचा सन्मान करण्याचे ऐतिहासिक काम विलासरावांनी केले, अशा भावना इतिहासाचे अभ्यासक प्रा. श्रीमंत कोकाटे (shirmant kokate) यांनी व्यक्त करत विलासराव देशमुख यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. (In one visit, Vilasrao Deshmukh corrected the mistakes in the book Shivchhatrapati)

महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज (ता. २६ मे) जयंती आहे. यानिमित्ताने राज्यभरातून मान्यवरांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. शिवछत्रपतींचे अभ्यासक व प्रसिद्ध वक्ते श्रीमंत कोकाटे यांनी अशीच आठवण ‘सरकारनामा’कडे व्यक्त केली. 

हेही वाचा : माजी सभापती मंगलदास बांदल यांना अटक

‘‘तत्कालीन शिक्षणमंत्री रामकृष्ण मोरे यांना 2001 मध्ये भेटून जे पुस्तक 30 वर्षे शिकवले जात होते, त्या चौथीच्या शिवछत्रपती पुस्तकातील 63 चुका सप्रमाण सांगितल्या. त्यानंतर 2005 मध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांना भेटून इयत्ता चौथीच्या शिवछत्रपती या पुस्तकात खूप चुका असून त्या चुका शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या आहेत, हे निदर्शनास आणून दिले. तेव्हा छत्रपती उदयनराजेंनी लगेच तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना फोन करून महत्वाच्या कामासाठी वेळ पाहिजे, असे सांगितले. विलासरावांनी त्वरित गिरवी (ता. फलटण) येथे माजी आमदार चिमणराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त येत आहे. तेथे आलात, तर सविस्तर बोलू, असा निरोप दिला,’’ असे कोकाटे यांनी सांगितले.
 
ते म्हणाले की, मी आणि लातूरचे श्रीमंत जाधव नियोजित दिवशी सकाळीच गिरवीत पोचलो. उदयनराजे, विलासराव देशमुख आणि आम्ही त्या पुस्तकावर सुमारे एक तास चर्चा केली. शिवाजीराजे, जिजाऊ, शहाजीराजे यांच्या बदनामीचा कट कसा शिजला आणि त्याला या पुस्तकात कशी पूरक व अनैतिहासिक मांडणी जोडली आहे, हे सप्रमाण पटवून दिले. विलासरावांना अनेक परिच्छेद, ओळी वाचून दाखविल्या. तेव्हा विलासरावांनी लगेचच तेव्हाचे शिक्षणमंत्री वसंत पुरके यांना या विषयाची कल्पना दिली. 

‘‘पुरके सरांनीही या विषयात गंभीरपणे लक्ष घातले, स्वतः संदर्भ वाचले. मग हा विषय मनावर घेऊन थेट समिती नेमली. म्हणून एकाच भेटीत विलासरावांनी शिवरायांचा सन्मान करण्याचे ऐतिहासिक काम केले, असे म्हणावे लागेल," अशा आठवणी कोकाटे यांनी नमूद केल्या. तसेच, बदललेल्या नव्या पुस्तकात अजूनही काही अनैतिहासिक बाबी आहेत. त्यातही बदल होणे अत्यावश्यक आहे," असे मतही त्यांनी मांडले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख