भिडे गुरूजींना चांडाळ चौकडीने घेरलेय - नितीन चौगुले - Major Rift in Sambhaji Bhide's Shivapratishthan | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

भिडे गुरूजींना चांडाळ चौकडीने घेरलेय - नितीन चौगुले

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

श्री. भिडे गुरूजींसोबत गेली २० वर्षे सावलीप्रमाणे असलेल्या नितीन चौगुले यांना नुकतेच निलंबित केल्यामुळे ते पुढे काय करणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह विविध भागातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले होते. श्री. चौगुले यांनी काही दिवस कार्यकर्त्यांची मते आजमावून घेतल्यानंतर काल येथील डेक्कन हॉलमध्ये शिवभक्तांचा मेळावा घेतला.

सांगली  : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरूजींना वाळू तस्कर, पतसंस्था बुडवणारे, खासगी सावकारी व फसवणूक करणाऱ्यांनी घेरले आहे. लाचाराप्रमाणे गुरूजींना सर्वत्र फिरवून वापर केला जातोय. गुरूजींभोवती असलेल्या चांडाळ चौकडीने मला बदनाम करून माझ्याविषयी द्वेष निर्माण केला. माझे निलंबन करायला लावले. परंतु मी काही कच्च्या गुरूजींचा चेला नाही. गुरूजींच्या मनातून माझे निलंबन कोणीही करू शकणार नाही, असे जाहीर आव्हान देत नितीन चौगुले यांनी 'श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान' या नव्या संघटनेची घोषणा केली आहे.

श्री. भिडे गुरूजींसोबत गेली २० वर्षे सावलीप्रमाणे असलेल्या नितीन चौगुले यांना नुकतेच निलंबित केल्यामुळे ते पुढे काय करणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह विविध भागातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले होते. श्री. चौगुले यांनी काही दिवस कार्यकर्त्यांची मते आजमावून घेतल्यानंतर काल येथील डेक्कन हॉलमध्ये शिवभक्तांचा मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी शिवप्रतिष्ठानच्या उद्देशानचे वाटचाल करणाऱ्या "श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान' या नव्या संघटनेची घोषणा केली. यासपीठावर मुकुंद मासाळ (पुणे), विजय गुळवे (कोल्हापूर), राहुल महाजन (मुंबई), प्रशांत गायकवाड (सांगली), संतोष देवकर (नांदेड), चंद्रकांत मैगुरे (मिरज), आनंद चव्हाण, रामभाऊ जाधव (सांगली) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राज्यातील विविध भागातून कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. चौगुले म्हणाले, "शिवप्रतिष्ठानमध्ये गेली २० वर्षे प्रामाणिक आणि निस्वार्थीपणे काम केले. त्यामुळे गुरूजी आणि मी अनेकांच्या टार्गेटवर राहिलो. मी कोणत्याही भानगडीत, दोन नंबरच्या धंद्यात नसल्यामुळे मला अडकावयाचे कशात? यासाठी काही पापी लोक प्रतिष्ठानमध्ये कार्यरत राहिले. त्यांनी एकप्रकारे सुपारीच घेतली होती. गुरूजींच्या भोवती वाळू तस्कर, तोंडात २४ तास मावा असणारे, पतसंस्था बुडवणारे, खासगी सावकारीचे गुन्हे असणारे, ठेकेदारी करणारे तसेच जुगारी वावरत होते. या चांडाळ चौकडीने कारवाईपासून स्वत:ला वाचवण्यासाठी गुरूजींचा वापर केला. लाचाराप्रमाणे त्यांना पोलिसांपासून ते महसूल कार्यालयापर्यंत फिरवले. गुरूजींना बदनाम करून ते सतत कोठे ना कोठे अडकतील? यासाठीच प्रयत्न केला. कार्यकर्त्यांचे हित म्हणून गुरूजी त्यांच्याबरोबर गेले. गुरूजींना त्यांच्यापासून सावध करण्याचा मी प्रयत्नही केला.''

ते पुढे म्हणाले, "कोरोना संसर्गामुळे मी घरातच राहिल्यानंतर चांडाळ चौकडीने माझ्याविषयी गुरूजींच्या मनात द्वेष निर्माण केला. मला बदनाम करण्याचे कारस्थान रचले गेले. परंतु मी कार्यातून त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मी राज्यात दौरा करत असताना गुरूजींच्या विरोधात मोहीम उघडल्याची अफवा पसरवली गेली. अपमान होत असूनही मी काम करत राहिलो. तेव्हा चांडाळ चौकडीने शेवटचे शस्त्र म्हणून माझे चारित्र्यहनन केले. त्यातूनच काही दिवसापूर्वी माझे निलंबन केले गेले. आरोपींना म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते, परंतु मला संधी दिली नाही. मला निलंबित केल्याचा व्हिडिओ चांडाळ चौकडीने सर्वत्र व्हायरल केला. परंतु मी काही कच्च्या गुरूजींचा चेला नाही. निलंबित केल्यानंतर मी संपून जाईन असे वाटत असल्यास ते चुकीचे आहे. मला संपवण्याचा कोणाचा घास नाही. प्रतिष्ठानच्या धारकऱ्यांच्या मनातून तसेच गुरूजींच्या मनातून माझे निलंबन कोणीही करू शकणार नाही. शिवप्रतिष्ठानच्या वाटचालीनेच काम करण्याची शपथ जगदीश्‍वराच्या मंदिरात घेऊन श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या संघटनेची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.''

गुरूजींविरोधात शक्तीप्रदर्शन नाही
गुरूजींनीच घडवले असल्याचे सांगतानाच श्री. चौगुले यांना गहिवरून आले. गुरूजींनी त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी कधी स्थळ बघितले नाही. परंतु माझे स्थळ बघण्यापासून लग्नापर्यंत त्यांनी पुढाकार घेतला. त्या गुरूजींविरोधात शक्तीप्रदर्शन करणे शक्‍यच नाही. शिवप्रतिष्ठानच्या ध्येयाप्रमाणेच संघटनेची वाटचाल राहिल. प्रतिष्ठानच्या धारकऱ्याच्या मदतीसाठी मी कधीही धावून जाईन. सामाजिक कार्यात अग्रेसर राहीन. शिवरायांच्या साथीदारांच्या समाधींचा जीर्णोद्धार केला जाईल. छत्रपती उदयनराजेंच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहीन, असेही श्री. चौगुले यांनी सांगितले. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख