मिरा भाईंदर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सूत्रे जितेंद्र आव्हाड यांच्या हाती - Jitendra Awhad to lead NCP in Mira Bhayander | Politics Marathi News - Sarkarnama

मिरा भाईंदर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सूत्रे जितेंद्र आव्हाड यांच्या हाती

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी जितेंद्र आव्हाड मैदानात उतरले असून त्यांनी नुकताच कार्यकर्ता मेळावा घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला उभारी देण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी बेलापूरमधून हलणारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सूत्रे आता ठाण्यामधून हलणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

भाईंदर : राष्ट्रवादी कॉंग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी जितेंद्र आव्हाड मैदानात उतरले असून त्यांनी नुकताच कार्यकर्ता मेळावा घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला उभारी देण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी बेलापूरमधून हलणारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सूत्रे आता ठाण्यामधून हलणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

एके काळी मिरा भाईंदर हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा भक्कम गड होता. त्या वेळी राष्ट्रवादीची सूत्रे नवी मुंबईतून हलविली जात होती; तर मिरा भाईंदरमध्ये गिल्बर्ट मेंडोसा हे या ठिकाणचे सर्वेसर्वा होते. भाईंदर हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यावर या ठिकाणचा पहिले आमदार म्हणून राष्ट्रवादीतर्फे मेंडोसा हे निवडून आले होते; परंतु नंतर येथील परिस्थिती बदलली आणि एके काळी सत्तेवर असलेली राष्ट्रवादी कॉंग्रेस बॅकफूटला गेली. 

मिरा भाईंदर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संतोष पेंडूरकर यांनी पक्षाची आढावा बैठक आयोजित केली होती. त्या वेळी मार्गदर्शन करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, "ज्यांच्या खांद्यावर मान टाकली त्यांनीच मान आवळली म्हणून राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून बालेकिल्ला असलेला बुरूज कोसळला; पण आता पुन्हा मिरा भाईंदर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला करणार. या शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती. महापौर, आमदार, खासदार राष्ट्रवादीचे होते; परंतु ज्यांच्या खांद्यावर मान टाकली त्यांनी मान आवळली म्हणून काही जण राष्ट्रवादी सोडून गेले असले, तरी तो आता इतिहास झाला. वर्तमान आणि भविष्यात पुन्हा राष्ट्रवादीच शहरावर राज्य करील, त्यासाठी कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन कार्य केले पाहिजे,''

या कार्यक्रमाला माजी खासदार आनंद परांजपे, संतोष धुवाळी, प्रमोद सरोदे, अरुण कदम, मोहन पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष संतोष पेंडूरकर यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यात सुप्रिया माईंणकर, साजिद पटेल, जक्की पटेल यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख