एकमेकांना धूळ चारल्यानंतर तब्बल अठरा वर्षांनी राजकारणातील दानवे गुरु-शिष्याची भेट...

राज्यातील काक-पुतण्याचे राजकीय भांडण दानवे जालन्यात आणि दानवे कुटुंबात घडले.... पुंडलिंक हरि दानवे हे रावसाहेब यांचे काका व राजकीय गुरूही आहेत.
Raoshaeb danve and pundlik danve meet after eighteen yeares news
Raoshaeb danve and pundlik danve meet after eighteen yeares news

जालना/भोकरदन ः केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी १८ वर्षांनंतर अचानक पिंपपळगाव सुतार येथे जाऊन  माजी खासदार पुंडलिक हरि दानवे यांची भेट घेतली, एके काळचे गुरू शिष्य मात्र गेल्या अठरा वर्षांपासून एकमेकाचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या दोन दानवेच्या या ग्रेट भेटीमुळे जालना जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राजकीय फायद्याशिवाय सहजासहजी कुणाची भेट न घेणारे रावसाहेब दानवे हे माजी खासदार जे सध्या राजकारणात सक्रीय नाहीत, त्यांची भेट तीही अठरा वर्षांनी घेतात, यामागे नेमक काय कारण असू शकेल, याचा अंदाज त्यांचे विरोधक आता बांधू लागले आहेत. 

रावसाहेब दानवे राजकारणातील आपल्या मोकळ्या ढाकळ्या स्वभाव आणि ग्रामीण शैलीसाठी प्रसिध्द आहेत. निवडणुकीच्या मैदानात समोरच्या विरोधकाला चितपट करण्याची त्यांची कला राजकारणात नेहमीच चर्चिली जाते. असे धुरंधर रावसाहेब आपल्या काकांना इतक्या वर्षानंतर भेटले. त्याची चर्चा चांगलीच रंगली. 

त्यांनी दिल्ली येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची काही महिन्यांपूर्वी भेट घेतली होती. या भेटीची राज्यात चर्चा झाली असली तरी ही फक्त सदिच्छा भेट होती, असे सांगत दानवे यांनी सस्पेंन्स कायम ठेवला होता. आता तब्बल १८ वर्षानंतर त्यांनी आपले राजकीय गुरू आणि कालांतराने शत्रू झालेले आपले काका माजी खासदार पुंडलिक हरि दानवे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. 

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्यात आहे. दानवे यांच्यावर या निवडणुकीची मोठी जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून आहे. या धामधुमीत त्यांनी पुंडलिक हरी दानवेंची भेट घेतली, यामागे काहीतरी खास कारण असणार असे बोलले जाते. गेल्या अठरा वर्षांपासून या गुरू-शिष्य दानवेंमधून विस्तव देखील जात नाही. टोकाचा राजकीय विरोध,  हाड वैर अशी विशेषण या दोघांच्या बाबतीत लावली जातात. त्यामुळे ही  भेट विशेष ठरते.

वयाची नव्वदी पार पण जोश कायम!

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचे वडील तत्कालीन जनसंघाचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले पुंडलिक हरी दानवे यांनी, वयाची नव्वदी पार केली आहे.  दोन वेळा जालना लोकसभेचे खासदार राहिलेले ,जनसंघ, जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.  पण गेल्या कित्येक वर्षापासून ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले आहेत. पण नव्वदीत देखील त्यांचे शारिरीक व मानसिक स्वास्थ ठणठणीत आहे. त्यामुळे अजूनही गावाकडे शेतात जाऊन ते काम करतात. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब यांच्या विरोधात लढण्याची आपली तयारी असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यांना आपणच पराभूत करू शकतो, असा दावाही त्यांनी केला होता. 

सुरवातीपासूनच जनसंघाचे काम करणारे  पुंडलिक हरी दानवे यांनी जनता पक्षाच्या माध्यमातून १९७७ ला पहिल्यांदा लोकसाभा निवडणूक जिंकून काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या जालना लोकसभा मतदार संघात जनता पक्षाचा झेंडा रोवला. त्यानंतर १९८९ ला ते पुन्हा भाजपचे खासदार म्हणून निवडून आले. त्यांच्या काळात रावसाहेब दानवे हे खासदार पुंडलिक हरी दानवे यांचे कार्यकर्ते आणि पुतणे म्हणून ओळखले जायचे. १९८० मध्ये रावसाहेब दानवे यांनी पंचायत सामिती निवडणूक लढवली आणि ते जिंकले. सभातीपदाची माळ देखील त्यांच्याच गळ्यात पडली. नंतर भोकरदन तालुक्यात दोन दानवेंच्या राजकारणाला सुरवात झाली.

असे घडले रणकंदन

१९८५ साली रावसाहेब दानवे यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. १९९० च्या भोकरदन विधानसभा निवडणुकीत पुंडलिक हरी दानवे यांनी रावसाहेब दानवे यांना विजय मिळवून देण्यासाठी मतदारसंघ पिंजून काढला. त्यांनी घेतलेली मेहनत फळाला आली आणि रावसाहेब दानवे पहिल्यांदा विधानसभेत पोहचले. मात्र या निवडणुकीनंतर दोन्ही दानवेंमध्ये कामाच्या पद्धतीवरून एकमेकांत कुरबुरी सुरू झाल्या. पुंडलिक हरी दानवे यांच्या हातातील नेतृत्व हळूहळू रावसाहेब दानवे यांच्या हातात आले. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकात पुंडलिक हरी दानवे यांच्या मुलाच्या तिकिटावरून झालेला वाद तर विकोपाला गेला.

१९९६ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून पुंडलिक हरी दानवे यांना डावलून जनता दलातून आलेले उत्तमसिंग पवार यांना उमेदवारी देण्यात आली. तर १९९९ ला उत्तमसिंग पवारांना बाजूला सारून रावसाहेब दानवे यांना पक्षाने उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते विजयी झाेले आणि लोकसभेत गेले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही आणि सलग पाचवेळा निवडून येण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. आज ते केंद्रात राज्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. 

मंत्री असलेल्या बागडेंना जाब विचारला..

रावसाहेब दानवे लोकसभा लढवत असल्याने आपल्या मुलाला चंद्रकांत दानवे यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून पुंडलिक हरि दानवे यांनी पक्षाकडे  हट्ट धरला होता. पण यावेळीही पक्षाने त्यांची मागणी धुडकावत रावसाहेब दानवे गटाच्या माजी आमदार विठ्ठलरावअण्णा सपकाळ यांना उमेदवारी दिली. तेव्हा पासूनच पुंडलिक हरी दानवे यांच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थाने उतरती कळा लागली. भारतीय जनता पक्ष सतत डावलत असल्याने पुंडलिक दानवे नाराज होते.

दरम्यान राममंदिर आंदोलनाच्या निमित्ताने 1999 मध्ये औरंगाबाद येथील प्रवीण तोगडिया यांच्या जाहीर  सभेनंतर तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे  मंत्री असलेल्या हरिभाऊ बागडे यांना त्यांनी चांगलेच खडसावले होते. भोकरदनचे तत्कालीन आमदार विठ्ठलराव अण्णा सपकाळ यांच्या निधनानंतर  २००२ च्या भोकरदन विधानसभा पोटनिवडणुकीत पुंडलिक हरी दानवे आणि चंद्रकांत दानवे पिता पुत्रांनी भारतीय जनता पक्ष सोडला आणि ते राष्ट्रवादीत दाखल झाले.

जिल्ह्यातील नेते अंकुशराव टोपे यांनी दोन दानवेंच्या राजकीय विरोधाचा फायदा घेत चंद्रकांत दानवे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन पोट निवडणूकित भोकरदन विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. एवढेच नाही तर पूर्ण राजकीय ताकद पणाला लावून चंद्रकांत दानवे यांना निवडूनही आणले . त्यानंतर चंद्रकांत दानवे हे सलग तीनवेळा आमदार झाले. त्यांनी भाजपच्या शिवाजीराव थोटे यांचा दोनवेळा तर रावसाहेब दानवे यांच्या पत्नी निर्मलाताई दानवे यांचा एकदा पराभव केला होता. 

भोकरदन पॅटर्नची चर्चा..

भोकरदन पॅटर्न म्हणून गाजलेल्या व राष्ट्रवादी काँग्रेसमय झालेल्या भोकरदन विधानसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांनी पुन्हा २०१४ व २०१९ च्या निवडणूकित त्यांचे चिरंजीव संतोष दांनवे यांना भाजपाची उमेदवारी देऊन चंद्रकांत दानवे यांचा सलग दोनदा पराभव केला व मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व पुन्हा निर्माण केले. पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवाराच्या प्रचार सभेसाठी दाभाडीकडे जात असतांना दानवे यांच्या गाड्यांचा ताफा अचानक सुतार पिंपळगावच्या शेतात असलेल्या पुंडलिक हरी दानवे यांच्या घराकडे वळवला.

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुंडलिक हरी दानवे यांची भेट घेत जवळपास तासभर चर्चाही केली. आपण आपले गुरू पुंडलिक हरी दानवे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेलो होतो, ही सदिच्छा भेट होती हे नेहमीचे उत्तर दानवे यांनी दिले. आता ही नेमकी भेट कशासाठी, याचा अर्थ काय हे लवकरच स्पष्ट होईल, असेही राजकीय वर्तुळात बोलले जाते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com