डॉ. अजित गोपछडे यांना मिळाले पक्षनिष्ठेचे फळ

भाजपमध्ये एकनिष्ठ असलेल्या डॉ. गोपछडे यांनीपंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत काम करताना महाराष्ट्रात डॉक्टरांचे संघटन मजबूत केले आणि त्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे सुरु केली. रामदेवबाबांच्या संपर्कात राहून अनेकविध उपक्रम राबवले.
Dr. Ajit Gopchade with Devendra Phadanavis
Dr. Ajit Gopchade with Devendra Phadanavis

नांदेड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षात डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या बालरोगतज्ज्ञ डॉ. अजित गोपछडे यांना भाजपकडून विधानपरिषदेची संधी मिळाली आहे. नांदेडमध्ये लोकसभा आणि नांदेड तसेच नायगाव विधानसभेसाठी नेहमीच चर्चेत राहिलेल्या डॉ. गोपछडे यांना अखेर पक्षनिष्ठेचे फळ मिळाले आहे.
 
डॉ. गोपछडे यांचे मूळ गाव कोल्हे बोरगाव (ता. बिलोली) असून त्यांचे वडील प्रा. माधवराव गोपछडे तर काका प्राचार्य गोविंदराव गोपछडे आहेत. गोपछडे कुटुंब नेहमीच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर असून या संस्कारक्षम कुटुंबात जन्म घेतलेल्या डॉ. गोपछडे यांचे बारावीचे शिक्षण नांदेडला यशवंत महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी एमबीबीएस औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर पदव्युत्तर शिक्षण (बालरोगतज्ज्ञ) अंबेजोगाई (जि. बिड) येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात झाले.

महाविद्यालयात असताना त्यांनी मार्डच्या चळवळीचे नेतृत्व केले. त्याचबरोबर प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे तसेच नितीन गडकरी यांच्या संपर्कातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काम केले. त्यानंतर नांदेडला आल्यावर त्यांनी अमृतपथ बालरुग्णालय सुरु केले. पत्नी डॉ. चेतना गोपछडे या देखील स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. नांदेडला सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या डॉ. गोपछडे यांनी अनेक उपक्रम राबवले. त्याचबरोबर गुरुगोविंदसिंघजी रक्तपेढी सुरु करण्यातही त्यांचा मोठा वाटा होता.

गोपछडे भाजपच्या डाॅक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष

भाजपच्या डॉक्टर सेलचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र आरोग्य विद्यापाठीचे ते संचालकही आहेत. नांदेड लोकसभा तसेच नांदेड विधानसभेसाठीही भाजपकडून त्यांचे नाव नेहमीच अग्रेसर असायचे. पण नंतर लिंगायत आणि मराठा कार्डचा विषय आला की, त्यांचे नाव मागे गेल्याची खंत कार्यकर्ते व्यक्त करुन दाखवायचे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघाचे त्यांना प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. अखेर त्यांना विधानपरिषदेच्या माध्यमातून आमदारकीची संधी मिळाली आहे.

सुरवातीपासूनच भाजपमध्ये एकनिष्ठ असलेल्या डॉ. गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत काम करताना महाराष्ट्रात डॉक्टरांचे संघटन मजबूत केले आणि त्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे सुरु केली. रामदेवबाबांच्या संपर्कात राहून अनेकविध उपक्रम राबवले.

नांदेडला भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर आहेत तर जिल्ह्यात भाजपचे राजेश पवार (नायगाव), डॉ. तुषार राठोड (मुखेड), भीमराव केराम (किनवट) हे तीन आमदार आहेत. त्याचबरोबर मागील वेळेस विधानपरिषदेवर भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांना संधी देण्यात आली. त्यामुळे चार आमदार आणि एक खासदार असलेल्या नांदेड जिल्ह्यात आता डॉ. गोपछडे यांच्या माध्यमातून आणखी एका आमदाराची भर पडणार आहे. 

नांदेडला कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे असलेल्या वर्चस्वाला आगामी काळात शह देण्यासाठी भविष्यात भाजपकडून लिंगायत समाजाचे नेतृत्व देण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हा प्रयत्न केला आहे. आता तो कितपत यशस्वी ठरणार, हे येत्या काळात कळेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com