मोठी बातमी : राज्यातील झेडपी, पंचायत समितीच्या पोटनिवडणुका स्थगित - Zilla Parishad, Panchayat Samiti by-elections postponed: Election Commission announcement | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

मोठी बातमी : राज्यातील झेडपी, पंचायत समितीच्या पोटनिवडणुका स्थगित

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 9 जुलै 2021

निवडणूक आयोगाने ह्या निवडणुका स्थगित करून राजकीय कोंडीत सापडलेल्या राज्य सरकारची एक प्रकारे सुटकाच केली आहे.

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरलेली नसतानाच तिसऱ्या लाटेची आणि ‘डेल्टा प्लस’चा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची भीती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू  करण्यात आलेले आहेत. त्यामुळे राज्यातील 5 जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आज (ता. ९ जुलै) आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत आहे, अशी घोषणा राज्याचे निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली. (Zilla Parishad, Panchayat Samiti by-elections postponed: Election Commission announcement)

दरम्यान, ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने राज्यात मोठा राजकीय गदारोळ उठला होता. त्यातून या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित करण्यात याव्यात, अशी मागणी विविध संघटनांकडून करण्यात येत होती. याशिवाय राज्य सरकारकडून या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणीचे पत्र राज्याच्या निवडणूक आयोगाला पाठविण्यात आले होते.

निवडणूक आयोगाने ह्या निवडणुका स्थगित करून राजकीय कोंडीत सापडलेल्या राज्य सरकारची एक प्रकारे सुटकाच केली आहे. कारण, ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात लढण्यासाठी इम्पारिकल डाटा मिळविण्यासाठी सरकारला एक प्रकारे मुदतवाढ मिळल्याचे मानले जात आहे. 

हेही वाचा :  अमित शहांनी राज्यातील सहकाराला त्रास दिल्यास आम्हीही कार्यक्रम करू 

निवडणूक आयुक्त मदान यांनी याबाबत सांगितले की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदांमधील 70 निवडणूक विभाग आणि 33 पंचायत समित्यांच्या 130 गणांमधील पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार होते. पण, 7 जुलै 2021 रोजी राज्य सरकारने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती.

सर्वोच्च न्यायालयाचे 6 जुलै 2021 रोजीचे आदेश आणि राज्य सरकारची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारकडून कोविड-19 बाबत अधिकची माहिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविले होते. त्याआधारे आयोगाने या निवडणुका आज आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहितादेखील आजपासून शिथिल करण्यात आली आहे. कोविड-19 ची परिस्थिती सुधारल्यावर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे घोषणा करण्यात येईल, असेही मदान यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख