भाजपचे बाराच आमदार निलंबित का? अजित पवारांनी सांगितले कारण... - Why only 12 BJP MLAs are suspended : Ajit Pawar say Reason | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

भाजपचे बाराच आमदार निलंबित का? अजित पवारांनी सांगितले कारण...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 6 जुलै 2021

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा काहीही संबंध नाही.

मुंबई : विधानसभेत सोमवारी (ता. ५ जुलै) जे काही घडले ते अशोभनीय असेच होते. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांकडून चुका झालेल्या आहेत. ज्यांनी विधानसभेत गोंधळ घातला, ते 12 आमदार होते. कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडली. त्यामुळे राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा आणि विधानसभेत निलंबित करण्यात आलेल्या १२ आमदारांचा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्मंत्री अजित पवार यांनी राज्यात सुरू असलेल्या चर्चेवर दिले. (Why only 12 BJP MLAs are suspended : Ajit Pawar say Reason ...)

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे मंगळवारी (ता. ६ जुलै) सायंकाळी सूप वाजले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. त्यावेळी त्यांनी निलंबनाचे समर्थन करत राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीशी या निलंबित १२ आमदारांशी कोणताही संबंध जोडू नये, असे आवाहन केले. 

हेही वाचा : भास्करराव माझ्यासारखे तापट असूनही शांत होते : अजित पवार

अजित पवार म्हणाले की, विधीमंडळाचे पावित्र्य राखले गेलेच पाहिजे. भाजपच्या आमदारांनी काल विधानसभेत चुका केल्या. त्यामुळेच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. पण, काल विरोधी पक्षाचा तोल का गेला, हे कळलं नाही. भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांकडून चुका झालेल्या आहेत. हे मान्यच करावे लागेल. त्यानंतर विधानसभा उपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये जे काही घडलं, ते भास्करराव जाधव यांनी सर्व काही विधानसभेच्या सभागृहात सांगितले. भास्करराव माझ्यासारखे तापट असूनही शांत होते. शांततेने ते वागत होते. शिवसैनिक असून ते शांत होते.

विधानसभेत गोंधळ घातल्याने भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले. त्याच्या निषेधार्थ आज (ता. ६ जुलै) भाजपने सुरुवातीला विधानसभा सभागृहाच्या पायऱ्यांवर अधिवेशन भरवले. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले, चुका करूनही आज भाजपने विधिमंडळाच्या आवारात प्रतिविधानसभा भरवली. त्यातून विरोधी पक्षाने लोकशाहीच्या पवित्र मंदिराचा अपमान केला आहे. संसद आणि विधानसभेत बेलगाम वागणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. याचीही आठवणही अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना करून दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख