पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशीच रायगडावरील रोषणाईचा वाद पुढे आला. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी या रोषणाईला आक्षेप घेतल्याने नक्की काय घडले, याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावरील रोषणाई गेले काही वर्षे बंद होती. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकताच रायगडाचा दौरा केला होता. त्यांनी त्या दौऱ्यात पुरातत्व विभागाला रोषणाई सुरू करण्यासाठी आग्रह धरला व स्वनिधीतून त्यासाठी पैसे देण्याची तयारी दाखवली. हा किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. त्यांनी त्यांच्या कल्पनेनुसार ही रोषणाई केली.
यावरून चिडलेल्या संभाजीराजेंनी खरमरीत प्रतिक्रिया दिली. ``भारतीय पुरातत्त्व विभागाने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. त्यांचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबेरंगी प्रकाश योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो.`` ते एवढयावरच थांबले नाही तर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल, अशी कठोर टिकाही त्यांनी केली.
भारतीय पुरातत्त्व विभागाने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे.
भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल.
(1/2) pic.twitter.com/DjWLrMH5Gl
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 18, 2021
संभाजीराजे हे शिवजन्म सोहळ्यासाठी आज सकाळी शिवनेरीवर आले. त्यांनी रायगडावरील रोषणाईचा विषय माझ्यासाठी संपल्याचे जाहीर करत त्यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या रोषणाईबद्दल नाराजी व्यक्त करणारी प्रतिक्रिया दिली.
त्यावरूनही पडसाद सोशल मिडियात पडसाद उमटले. संभाजीराजे यांची टीका अनाठायी असल्याचे काही पोस्टमध्ये सांगण्यात आले. रितेश देशमुख यांनी म्हटले आहे की गडावर रोषणाई केली म्हणून चक्क त्याला काळा दिवस म्हणून संबोधने? अहों महाराज, काही दिवसांपूर्वी तुमचासुद्धा वाढदिवस होता. तुम्हीसुद्धा जिथं वास्तव्य करता त्या राजवाड्यावर रोषणाई केली नव्हती का? मुळात फक्त रोषणाई केली. तिथं काही डान्स धिंगाणा नाच गेला का ? यात अपमान कसा ? आणि काळा दिवस ? महाराज महाविकास आघाडी सरकारने शिवजयंती निमित्त १४४कलम लावले तुम्ही त्याचा एकदा तरी निषेध केला का? उलट तुम्ही अशा पुरातत्व विभागाचा निषेध करत आहात ज्यांनी अंधारात असलेल्या राजधानीला प्रकाशमान केले. याचा निषेध तुम्ही का करता आहात? मुळात त्या रोषणाई मध्ये काय चुकीचं आहे तुम्ही हे न सांगता हा काळा दिवस म्हणता आहात, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

