नाही... नाही...आम्ही आता वरुण सरदेसाईला सोडणार नाही

कारण तो नातलग आहे ना.
नाही... नाही...आम्ही आता वरुण सरदेसाईला सोडणार नाही
We will not leave Varun Sardesai now : Narayan Rane

रत्नागिरी : वरुण सरदेसाई येऊन आमच्या घरावर हल्ला करतो, तरीही त्याला अटक केली जात नाही. आता वरुण सरदेसाई परत आला, तर माघारी जाणार नाही. नाही...नाही, आमच्या घरावर कोणीही  येईल, त्याला आम्ही सोडणार नाही. तो वरुण येऊ देच आता, असा गर्भित इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना दिला. (We will not leave Varun Sardesai now : Narayan Rane)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राणे यांना अटक झाली होती. जामिनावर सुटका झाल्यानंतर आजपासून त्यांची जनआशीर्वाद यात्रा रत्नागिरीत पुन्हा सुरू झाली. त्यावेळी राणे यांनी सरदेसाई यांना गर्भित इशारा दिला. 

ते म्हणाले की, वरुण सरदेसाई येऊन आमच्या घरावर हल्ला करतो, पण त्याला अटक केली जात नाही. कारण तो नातलग आहे ना. जमा करून आणून देतो, त्यामुळे त्याची एवढी वट आहे. कुठल्याही नेत्याला जो पोलिस बंदोबस्त नाही, तो त्याला आहे, तरीही त्या दिवशी त्याने मार खाल्ला. एवढे पोलिस असूनही तेथील मुलांनी वरुण सरदेसाईला चोपलं.

दरोडेखोरांना जशी अटक करतात, तशी मला केंद्रीय मंत्र्यांना अटक केली. अटक करण्यासाठी २०० पोलिसांचा फौजफाटा, काय पराक्रम केला? माझा घसा ठिक होऊ द्या. मी सोडणार नाही. माझा आवाज पूर्वीसारखा झाल्यानंतर मी खणखणीत वाजवणार आहे. मोरे यांची हत्या कशी झाली. त्याचे कारण काय, आम्हालाही माहिती आहे. आपल्याच भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकायला कोणी कोणाला सांगितले, हे माहिती आहे. टप्याटप्याने सगळे बाहेर काढणार. सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सॅलियनची केस अजून संपलेली नाही. मी केंद्रात मंत्री आहे, असाही इशारा राणेंनी दिला. 

मला अटक केली, असे काय केले होते मी. एका जुन्या प्रकरणाबद्दल मला पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर मी उत्तर दिले होते. त्यावेळी मी तिथे असतो तर, असे म्हणालो होतो, असे राणे यांनी नमूद केले आहे. 

वाजवणार म्हणजे ढोलकी पण वाजवू शकतो. दोन वर्षांत कोकणाला काय दिले, असा सवाल त्यांनी केला. आम्हाला विधायक आणि विकासात्मक कामे करायची आहेत. घरात बसून आम्हाला काम करायचे नाही. काही केले नाही तर काय होणार. मला धमक्या नका देऊ मी ४० वर्षे सोबत होतो. माझ्याकडे मोठा मसाला आहे. शिवसेना औषधालासुद्धा मिळणार नाही, असे काम करा, असे राणे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितले.   

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in