जयंत पाटलांचा फडणवीसांसोबत एकत्र प्रवास; मुख्यमंत्र्यांच्या त्या विधानाला उत्तर?

महाविकास आघाडीमध्ये चाललंय काय?
Jayant Patil's journey together with Fadnavis; Answer to that statement of Chief Minister
Jayant Patil's journey together with Fadnavis; Answer to that statement of Chief Minister

पुणे : औरंगाबादमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्याकडे कटाक्ष टाकत `एकत्रित आले तर भावी सहकारी` असा उल्लेख केला होता. मुख्यमंत्र्यांच्या विधानाने उठलेला राजकीय धुराळा खाली बसतो न बसतोच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास करत दुसरा धक्का दिला. यातून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या त्या विधानाला अप्रत्यक्ष उत्तर दिल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये चाललंय काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. (Jayant Patil's journey together with Fadnavis; Answer to that statement of Chief Minister)

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या त्या विधनामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. मात्र, त्याला दुजोरा मिळू शकला नाही. विशेष म्हणजे त्यानंतर महाविकास आघाडी उभारणीत ज्यांचा मोठा हातभार आहे, त्या खासदार संजय राऊत यांनी लागलीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्याचा तपशील माध्यमांना सांगण्यास नकार दिल्याने त्या भेटीबाबतचे कुतूहल आणखी वाढले आहे.

महाविकास आघाडीच्या स्थापनेपासूनच राज्यात हे सरकार किती दिवस चालणार असा प्रश्न पहिल्या दिवसापासूनच विचारला जात आहे. त्यानंतरही भाजपच्या नेत्यांकडून सरकारच्या स्थैर्याबाबत वारंवार चर्चा घडवून आणली जात आहे. 

परवा देहू येथील एका कार्यक्रमावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘मला माजी मंत्री म्हणून नका, येत्या ४८ तासांत काय घडते ते पहा,’ असे म्हटले होते. योगायोगाची गोष्ट म्हणजे त्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला भावी म्हणत राजकीय धुराळा उडवून दिला. पण, त्या विधानाचा संदर्भ चंद्रकांत पाटलांच्या त्या सूचक इशाऱ्याशी जोडला गेला आणि कधी नव्हे ते चंद्रकांतदादांच्या विधानाला महत्व आले. यातील विशेष बाब म्हणजे कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत बोलतानाही ठाकरे यांनी नव्या सहकाऱ्यासंदर्भात सूचक वक्तव्य केले होते. 

दुसरीकडे फडणवीस, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांनी ‘नवे सहकारी कसे आहेत, हे मुख्यमंत्र्यांना कळले असेल, त्यामुळे त्यांनी मनातील भावना बोलून दाखवली असेल,’ असे म्हणत या चर्चेला हवा देण्याचे काम केले होते. 

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाची चर्चा थांबायच्या आताच राज्याला दुसरा एक धक्का बसला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नंदूरबार येथील कार्यक्रमाला जाताना एकाच गाडीतून प्रवास केला. भलेही मुख्यमंत्र्यांनी दोन्ही काँग्रेसला इशारा देण्यासाठी कालचे वक्तव्य केले असली तरी आज जयंत पाटील यांनी तर फडणवीस यांच्यासोबत प्रवास करून शिवसेनेला आम्हालाही कमी समजू नका, असा अप्रत्यक्ष टोला लगावल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या कालच्या विधानामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार नाराज असल्याची चर्चा आज दुपारनंतर सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी ठाकरे यांची भेट घेत तासभर चर्चा केली. पण त्या भेटीचा तपशील सांगण्यास मात्र खासदार राऊतांनी नकार दिला. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळाला धक्क्यावर धक्के बसत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com