महाराष्ट्रातील सत्ता गेल्यानंतर भाजप नेते तब्बल दीड वर्षानंतर खळखळून हसले..... - smile on BJP leaders after victory in Pandhrpur by election | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्रातील सत्ता गेल्यानंतर भाजप नेते तब्बल दीड वर्षानंतर खळखळून हसले.....

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 9 मे 2021

महाआघाडी सरकारच्या विरोधात पहिला राजकीय विजय..

मुंबई : राज्यात हातात आलेली सत्ता 2019 मध्ये गेल्यानंतर महाराष्ट्रात भाजपची (BJP out of Power in Maharashtra) तशी राजकीय पिछेहाटच झाली. 2019 मध्ये सत्तेवर आल्याचा आनंद फार काळ टिकला नाही. नंतर महाविकास आघाडीच्या विरोधात राजकीय संघर्षात थोडीशी पिछेहाट स्वीकारावी लागली. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भाजपला खऱ्या अर्थाने एखादी राजकीय यश मिळाले. त्यानंतर या नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. (BJP leaders greet Devendra Fadnavis for victory in Pndharpur by election)

भाजपला गेली दीड वर्षे राजकीय संकटाचा सामना करावा लागला. भाजपची खरी परीक्षा होती ती विधान परिषद निवडणूकीच्या वेळी. मात्र पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या पदवीधर मतदारसंघात भाजपला सपाटून मार खावा लागला. त्यातही पुणे आणि नागपूर या दोन्ही मतदारसंघात भाजपला विजयाचा विश्वास होता. पुण्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि नागपुरात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. मात्र तेथेही नामुष्की आली. त्यानंतर सांगली आणि जळगाव या महापालिकांमध्ये भाजपचे बहुमत असताना महाआघाडीने येथील महापौरपद खेचून घेतले. त्यातून भाजपमध्ये अनेक ठिकाणी आऊटगोइंग सुरू झाले. एकनाथ खडसे यांच्यासारखा नेता पक्ष सोडून गेला. महाआघाडी सरकारवर आरोप करण्यातच भाजप नेत्यांचे दिवस जात होते. मात्र राजकीय यश मिळत नव्हते.

हे यश पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत मिळाले. सहानुभूतीची अपेक्षा असताना येथे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalake) पराभूत झाले. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा उमेदवार भाजपने पराभूत केला, हे या विजयाचे वैशिष्ट्य होतेच. पण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस हे तीनही पक्ष समोर एकत्र असताना भाजपचा उमेदवार निवडून आला, हा दुहेरी आनंद होता. पहिल्यांदाच महाआघाडीला भाजप भारी पडला. हा आनंद फडणवीस यांच्यासोबत तेथील नेत्यांनी रविवारी (ता 9) साजरा केला. फडणवीस यांना पेढा भरवून आनंद व्यक्त केला. याच निवडणुकीच्या प्रचारात तुम्ही भाजपचा उमेदवार निवडून द्या, मी महाविकास आघाडी सरकारचा पुढचा करेक्ट कार्यक्रम करतो, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. त्यामुळे ही निवडणूक आणखी चर्चेची ठरली होती.

 

विजयी उमेदवार समाधान अवताडे, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार प्रशांत परिचारक, सदाभाऊ खोत, रणजितसिंह मोहिते पाटील, राम सातपुते, जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आदी मंडळी उपस्थित होती.

`तुम्हा सर्वांचे परिश्रम आणि जनतेचा मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर असलेला ठाम विश्वास या निकालातून व्यक्त झाला. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि समाधान आवताडे यांना या नव्या भूमिकेतून जनसेवेच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा.
त्यांच्या हातून आमच्या हृदयाच्या अतिशय जवळ असलेल्या पंढरीची आणि मंगळवेढा-पंढरपूरकरांची भरपूर सेवा घडो, अशा शुभेच्छा फडणवीस यांनी या वेळी दिल्या. 

या पोटनिवडणुकीसाठी पंढरपूरात १५ दिवस तळ ठोकून बसलेले भेगडे यांच्या कामाची पक्षाने तातडीने दखल घेत त्यांचा खास सत्कार या वेळी करण्यात आला. पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वी केल्याबद्दल फडणवीसांनी माजी राज्यमंत्री भेगडेंचे अभिनंदन केले. हा सत्कार माझा नसून तो माझ्याबरोबर काम केलेल्या कार्यकर्त्यांचा असल्याचे उत्तर भेगडेंनी सत्काराला दिले.

वाचा ही पण बातमी : मुख्यमंत्री घरात, अजितदादा पुण्यात पण गडकरींनी विदर्भाला सांभाळले....

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख