शरद पवारांनी सांगितला पुणे ते शिवनेरी सायकल सफरीचा किस्सा 

मीही जेव्हा प्रवासाला निघतो, तेव्हा मी हवाईमार्ग टाळतो.
Sharad Pawar told the story of Pune to Shivneri cycle journey
Sharad Pawar told the story of Pune to Shivneri cycle journey

बारामती : "जीवन जगत असताना प्रत्येकाने निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मलाही जेव्हा विविध ठिकाणी जायचे असते, तेव्हा मी विमान किंवा हेलिकॉप्टरचा वापर टाळत रस्त्याने जातो. निसर्गाच्या सहवासात तुम्ही जितके जाल, तितकी तुमची प्रगल्भता वाढेल,' असा कानमंत्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज (ता. 17 जानेवारी) बारामतीकर युवा खेळाडूंना दिला. विद्यार्थिदशेत मीही पुणे ते शिवनेरी सायकल सफर केल्याचे सांगत पवारांनी युवा खेळाडूंना धक्का दिला. 

बारामती स्पोर्टस फाउंडेशनच्या सदस्यांनी नुकतीच बारामती-शिवनेरी-बारामती अशी सायकल सफर केली. या फाउंडेशनच्या सदस्यांनी आज पवार यांची गोविंद बाग येथे सदिच्छा भेट घेतली. तेव्हा मार्गदर्शन करताना पवार यांनी त्यांना कानमंत्र दिला. 

पवार म्हणाले की, तुम्ही सायकलवरून शिवनेरी दर्शन केल्याने त्या परिसराची तुम्ही पाहणी केली. निसर्गाच्या जवळ तुम्ही गेला, निसर्ग वाचनाची आवड तुम्हाला या निमित्ताने होईल. बारामतीत सायकलसह खेळाची संस्कृती रुजू पाहते, ही बाब समाधानाची आहे. विद्यार्थीदशेत मीही पुणे ते शिवनेरी सायकलवरून गेलो होतो, त्या काळात वाहनाची सोय नव्हती आणि आमच्याकडे वाहनेही नव्हती, त्यामुळे आम्ही सायकलवरून शिवनेरी गाठल्याचे पवारांनी सांगितल्यावर उपस्थितांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला. 

"मीही जेव्हा प्रवासाला निघतो, तेव्हा मी हवाईमार्ग टाळतो; कारण मलाही रस्त्यांची माहिती होते. त्या भागातील परिस्थिती काय आहे, हे समजते. लोकांशी संवाद साधता येतो. त्या परिसरात कोणती पिके कशी येतात, शेतकऱ्यांची काय अडचण आहे, हे समजते. या निमित्ताने मला लोकांना भेटता येते, त्यांच्याशी संवाद साधता येतो,'' असे पवार यांनी युवा खेळाडूंना सांगितले. 

बारामती स्पोर्टस फाउंडेशनचे अध्यक्ष आयर्नमॅन सतीश ननवरे यांनी प्रास्ताविकात फाउंडेशनच्या स्थापनेमागील पार्श्वभूमी विशद केली. बारामतीत नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करणार असल्याचे ननवरे यांनी पवारांना या वेळी सांगितले. 

 खेळाडू भारावले 

क्रीडा संस्कृती जोपासणाऱ्या शरद पवार यांची अचानक झालेली भेट, त्यांनी केलेले मार्गदर्शन, तसेच शरद पवारांनी पुणे ते शिवनेरी सायकलवरून प्रवास केल्याचा त्यांचा किस्सा ऐकल्यानंतर बारामतीतील खेळाडू भारावून गेले होते. केवळ राजकारणी म्हणून नव्हे; तर एक क्रीडाप्रेमी म्हणूनही त्यांच्याविषयीचा आदर दुणावल्याचे या खेळाडूंनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com