कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी केला शरद पवारांना फोन 

त्यांचा पदाचा मान ठेवून मी त्यांना जाऊन भेटलो.
कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी केला शरद पवारांना फोन 
Sharad Pawar meet to Karnataka Chief Minister Basavaraj Bommai

बेंगलोर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटीचा सिलसिला कायम आहे. बेंगलोरच्या दौऱ्यावर असलेल्या पवार यांनी आज (ता. ६ ऑगस्ट) कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांनी फोन करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांचा पदाचा मान ठेवून मी त्यांना जाऊन भेटलो, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे. (Sharad Pawar meet to Karnataka Chief Minister Basavaraj Bommai)

ज्येष्ठ नेते शरद पवार हे बेंगलोरच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ही भेट झाली आहे. याबाबतची माहिती पवार यांनी ट्विट करून दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मी बेंगलोरच्या दौऱ्यावर असताना मला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा फोन आला. त्यांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या पदाचा आदर राखून मी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मी मुख्यमंत्री बोम्मई यांना जाऊन भेटलो. त्यांच्या आदरातिथ्याबद्दल मी आभारी आहे. येत्या काही वर्षांमध्ये दोन्ही राज्ये (कर्नाटक-महाराष्ट्र) सहकार्याच्या दृष्टीने एकत्र काम करत राहतील, अशी आशा आहे.

दोन्ही राज्यातील पाणीवाटप आणि पूरपरिस्थितीच्या वेळी परस्परांमध्ये सामंजस्याची भूमिका घेऊन काम करण्याबाबतही या वेळी चर्चा झाली. कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील पाणीवाटपाबद्दल तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील पुराच्या प्रकरणांमध्ये परस्पर सहकार्य ठेवण्याबद्दलही दोघांमध्ये संवाद झाला. त्यांनी दोन्ही राज्यांमध्ये (कर्नाटक आणि महाराष्ट्र) आंतरराज्यीय पाणी समस्या आणि नदीच्या पाणीवाटपावर सविस्तर चर्चा करण्यासाठी लवकरच बैठक घेण्याचे ठरवले. या विषयावर चर्चा करण्यासाठी ही बैठक दिल्लीत घेण्याचे ठरविण्यात आले आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी गेल्या पंधरा दिवसांत अनेक भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनाही भेटले आहेत. पवार यांच्या भाजप नेत्यांच्या वाढत्या गाठीभेटीवरून राज्यात मात्र त्याची खमंग चर्चा सुरू आहे.

पवार यांनी मोदी आणि शहा यांच्या भेटीनंतर ट्विट करत माहिती दिली होती. नवे सहकार मंत्रालय आणि सहकारी क्षेत्रील बँकिंग संदर्भातील अडचणी या विषयावर त्यांनी या दोन्ही नेत्यांची भेट घेतली होती. शहा यांच्या भेटीच्या वेळी साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि खासदार सुनील तटकरे हे सोबत होते.  

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in