संभाजीराजे- प्रकाश आंबेडकर युती 50 विधानसभा मतदारसंघात धमाका उडविणार! - Sambhajiraje and Prakash Ambedkar equations may affect in 50 legislative constituencies | Politics Marathi News - Sarkarnama

संभाजीराजे- प्रकाश आंबेडकर युती 50 विधानसभा मतदारसंघात धमाका उडविणार!

योगेश कुटे
रविवार, 30 मे 2021

महाराष्ट्राचे राजकारण ताजे करणाऱ्या प्रयोगाची प्रतिक्षा

पुणे : खासदार छत्रपती संभाजीराजे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात ताजेपणा आणण्याचा आशावाद व्यक्त केला आहे. हा आशावाद केवळ बोलण्यापुरता आहे की खरेच तसे काही प्रत्यक्षात घडेल, यासाठी वाट पाहावी लागेल. पण त्यांच्या एकत्र येण्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू होणे स्वाभाविक आहे. (Sambhajiraje and Prakash Ambedkar alliance may bring new breeze in Maharahtra politics)

छत्रपती शाहू महाराजांचे वंशज म्हणून संभाजीराजे आणि घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी एकत्रितपणे राजकीय वाटचाल सुरू राहणे, हे ऐतिहासिक होईल. त्यामुळेच या दोघांच्या एकत्र येण्याचे शाहूशक्ती आणि भीमशक्तीचे मनोमीलन असे नामकरणही झाले. या दोघांचे व्यक्तिमत्व, राजकीय वाटचाल, संघर्ष यात जमीन-अस्मानचा फरक आहे. दोघांच्या काही दुखऱ्या नस आहेत. त्यावर या एकत्र येण्याने काही फरक पडेल का, याची उत्सुकता राहील. पण दोघांच्याही समर्थकांमध्ये टोकाचे अंतर आहे. ते कसे एकत्र येणार हा प्रश्नच आहे.

वाचा ही बातमी : संभाजीराजे आणि आंबेडकर यांच ठरलयं....

प्रकाश आंबेडकर हे नवीन राजकीय प्रयोग करण्यासाठी ओळखले जातात. रिडालोसचा प्रयोग त्यांनी केला. त्यानंतर काॅंग्रेसच्या सहकार्याने ते 1998 मध्ये खासदार झाले. नंतर त्यांनी भारिप बहुजन महासंघाचा वेगळा प्रयोग केला. त्यात अकोला जिल्ह्यापुरते मर्यादित यश मिळवले. त्यानंतर थेट वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग करून आंबेडकरी चळवळ, बारा बलुतेदार यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. यात एमआयएमशी हातमिळवणी त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी केली. हा प्रयोग साहजिकच त्या वेळी गाजला. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एमआयएमचा खासदार त्यामुळे झाला. काॅंग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या पराभवात या आघाडीने भूमिका बजावली. मात्र खुद्द आंबेडकरांचा सोलापुरात पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत अपेक्षेएवढे यश मिळाले नसले तरी तिचा परिणाम दिसून आला. एमआयएमसोबतची आघाडी आंबेडकर हे विधानसभा निवडणुकीत कायम ठेवतील, अशी चर्चा होती. मात्र ती ही आघाडी फुटली आणि दोन्ही पक्ष 2019 ची विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढले. मात्र अपेक्षित प्रभाव ते पाडू शकले नाहीत. 

संभाजीराजेंची राजकीय कोंडी

संभाजीराजेंचाही प्रवास हा  राष्ट्रवादी, भाजप आणि आता स्वतंत्र असा सुरू आहे. ते भाजपतर्फे राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेचे खासदार 2017 मध्ये झाले. य नियुक्तीच्या काही दिवस आधी त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उपस्थित राहून पक्षात प्रवेश केला होता. खासदार झाल्यानंतर त्यांना मंत्रीही करायचे ठरले होते. मात्र शाहू महाराजांचा वंशज भाजपमध्ये गेल्याची एवढी टीका झाली की संभाजीराजे बॅकफूटवर गेले. आपण भाजपमध्ये नाही, हे सांगण्यासाठीच नंतरची त्यांची एक-दोन वर्षे गेली. या पूर्वी त्यांनी 2009 मध्ये राष्ट्रवादीकडून कोल्हापूरमध्ये खासदारकीची निवडणूक लढविली होती. मात्र त्यात त्यांना अपयश आले. त्याच्या काही दिवस आधी त्यांनी मराठा आरक्षणाच्या जागृतीसाठी राज्यभर यात्रा काढली. त्यातून त्यांची चांगली प्रतिमा निर्माण झाली. मराठा समाजातील तरुणांत त्यांची क्रेझ आहे. भाजपला त्यांच्या या क्रेझचा उपयोग होईल, अशी अपेक्षा होती. म्हणूनच त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले होते. मात्र खासदार झाल्यानंतर राजेंनी भाजपच्या अधिकृत व्यासपीठावर जाण्याचे टाळले त टाळलेच. राजेंना भाजपने मंत्रीपदाचे आश्वासन दिले होते. मात्र ते प्रत्यक्षात न आल्याने ते नाराज झाल्याचीही चर्चा आहे.

वाचा ही बातमी : शिवशक्ती-शाहूशक्ती एकत्र येणार?

त्यात राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे आला. फडणवीस सरकारच्या काळात मिळालेले आरक्षण हे ठाकरेंच्या काळात गेले, हा मुद्दा भाजप प्रकर्षाने मांडत आहे. मात्र संभाजीराजे आरक्षण गेले तरी संयम ठेवा, अशी भूमिका मांडत आहेत. त्यावरून भाजप त्यांच्यावर आणखी नाराज होत असल्याचे त्या पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसते.

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांनी काही कलमी कार्यक्रम राज्य सरकारला दिला आहे. त्याची अंमलबजावणी शिवराज्यभिषेक दिनानिमित्त म्हणजे 6 जून 2021 पर्यंत न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. संभाजीराजेंसाठी मराठा आरक्षण हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यांनी मांडलेल्या भूमिकेला कसे यश मिळेल, हे पाहणे आता महत्वाचे ठरेल.

या साऱ्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर आणि संभाजीराजे एकत्र येतील का, याची उत्सुकता राहील. खरे तर दोघेही स्वकेंद्रित आहेत. त्यामुळे त्यांचे राजकीयदृष्ट्या एकमेकांशी पटेल, याची खात्री नाही. तरी सरकारवर दबाव टाकण्यासाठी पुढील काही निवडणुकांत ते एकत्र आले तर 45 ते 50 मतदारसंघावर ते प्रभाव टाकू शकतात. त्यांची व्होटबॅंक फार नाही. पण चुरशीच्या लढतीत ते पारडे फिरवू शकतील. मराठावाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भ, नाशिकमधील एक-दोन मतदारसंघ येथे या दोघांचा प्रभाव राहील. आंबेडकर यांची प्रत्येक जिल्ह्यात संघटना आहे. तसे संभाजीराजेंचे नाही. त्यामुळे आपले उमेदवार निवडून आणण्यापेक्षा कोणाचे तरी पाडण्यासाठी या युतीचा उपयोग होईल. त्याचा वापर कोण करून घेणार, हे उघड दिसते आहे. त्याचे उत्तर प्रकाश आंबेडकर यांनी दोघांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना अप्रत्यक्षरित्या दिले. काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आम्हाला दूर लोटते, असे आंबेडकर यांनी सांगितले. आंबेडकर यांच्या या बोलण्यातूनच याचे उत्तर मिळाले आहे. ही शाहूशक्ती आणि भीमशक्ती प्रत्यक्षात एकत्र येईल की नाही, याची खात्री देता येत नाही. पण त्यामुळे चर्चेला तरी ताजेपणा आला आहे, हे निश्चित.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख