राजनाथसिंहांचे ते विधान शिवरायांचा आणि महाराष्ट्राचा अवमान करणारे 

तरीदेखील संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे महाराजांच्या कार्यकर्तुत्वाचं श्रेय त्यांना देत असतील, तर ते बदनामीकारक आहे.
राजनाथसिंहांचे ते विधान शिवरायांचा आणि महाराष्ट्राचा अवमान करणारे 
Rajnath Singh's statement is insulting to Shivaraya and Maharashtra : shrimant kokate

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : छत्रपती शिवाजी महाराजांना खेळातून शिक्षण देण्याचे श्रेय देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी राजमाता जिजाऊ यांच्यासोबत रामदास स्वामी व दादोजी कोंडदेव यांना दिल्याने महाराष्ट्रात नवा वाद उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी राजनाथसिंह यांचं विधान शिवरायांचा आणि महाराष्ट्राचा अवमान करणारे आहे, अशी टीका करत राजनाथसिंह यांचा निषेधही केला आहे. (Rajnath Singh's statement is insulting to Shivaraya and Maharashtra : shrimant kokate)

पुण्यातील एका कार्यक्रमात राजनाथसिंह यांनी रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव व जिजामाता यांनी शिवाजी महाराजांना खेळातून शिक्षण दिले आणि देशाचे राष्ट्रनायक बनविले, अशा अर्थाचे विधान करत ‘गुरू’विषयीचा वाद नव्याने निर्माण केला आहे. आधीच महाराष्ट्रात या विषयवारून वादंग होते. त्यावर विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना श्रीमंत कोकाटे व अन्य इतिहास अभ्यासकांच्या पाठपुराव्याने इतिहास तज्ज्ञांची समिती नेमली होती. त्यानंतर दादोजी कोंडदेव अथवा रामदास स्वामी शिवरायांचे गुरू नसल्याचे स्पष्ट झाले होते. अभ्यासक्रमातूनही तसे उल्लेख त्यानंतर वगळण्यात आले होते. मात्र अधूनमधून हे उल्लेख समोर येऊन वाद निर्माण होण्याच्या घटना सुरूच होत्या. मात्र, आता खुद्द देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी उल्लेख केल्याने त्याला महत्व प्राप्त झाले आहे.

या पार्श्वभूमीवर परखड टीका करताना कोकाटे म्हणाले की, देशाच्या संरक्षणमंत्र्याकडे किमान प्राथमिक ज्ञान नसेल तर ते आपल्या देशाचे संरक्षण कसे करणार? त्यांचं महाराजांबद्दलचं विधान अनैतिहासिक, आक्षेपार्ह आणि बदनामीकारक आहे. क्रांतीकारक पिता शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊराजे यांनीच शिवरायांचं युद्धकलेचं अथवा अन्य शिक्षण केले आहे. 

माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने दादोजी अथवा रामदास स्वामी हे गुरू, शिक्षक, मार्गदर्शक वा प्रेरणास्थान नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, वा. सि. बेंद्रे, डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासारखे नामवंत इतिहासकारही हेच सांगतात. समकालीन ऐतिहासिक साधनांमध्येही दादोजी व रामदास स्वामी यांचा नामोल्लेखही नाही. जेधे शकावली, शिवभारत, राधामाधव विलास चंपू अशा समकालीन साधनांमध्येही त्यांचा नामोल्लेख नाही. तरीदेखील संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे महाराजांच्या कार्यकर्तुत्वाचं श्रेय त्यांना देत असतील, तर ते बदनामीकारक आहे. सर्व माहिती घेऊन विधान करणं, त्यांची जबाबदारी आहे, असेही कोकाटे यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in