political leaders Digvijay Singh and Babanrao Pachpute feels pain due to no wari this year | Sarkarnama

दिग्विजयसिहं, बबनराव पाचपुते, खासदार संजय जाधव, अण्णा डांगे यांच्या मनी ही रुखरुख.....

विलास काटे
सोमवार, 29 जून 2020

राजकीय नेतेही वारीपासून यंदा वंचित

आळंदी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा खबरदारी म्हणून आषाढी वारीसाठी पंढरपूरात जाणारे सर्व संतांचे पायी वारी सोहळे शासनाने रद्द केले. या निर्णयाने वारकरीच नाही तर वारीत चालणारे राजकिय वारकरीही वारी चुकल्याने खट्टू झाले. जीवनावेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी,,अशीच काहीसी अवस्था राजकीय वारक-यांचीही पायी वारी रद्द झाल्याने झाली.

यामध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉग्रेसचे जेष्ठ नेते दिग्वीजय सिंह यांनी माउलींचा सोहळा वाखरीत गेल्यानंतर आळंदीतील माउलींचे समाधी दर्शन आणि पंढरपूरच्या पांडूरंगाचे दर्शन कधी चुकवले नाही. गेली पंचवीस वर्षे सलग नित्यनेमाने वारी केली. पंढरपूर देवस्थानचे माजी अध्यक्ष आणि माजी मंत्री अण्णा डांगे यांनीही कधी वारी चुकवली नाही. मंत्री असतानाही माऊलींच्या सोहळ्यात पायी वारी केली. युतीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनीही वाखरी ते पंढरपूर अशी पायी वारी केली. त्यावेळी सुरक्षा रक्षकांकडून वारक-यांना झालेली झटापट आणि त्यानंतर त्यांनी व्यक्त केलेली दिलगीरी बराच काळ गाजली होती.

आघाडी सरकारच्या काळात अनेक वर्षे मंत्री म्हणून काम केलेले आणि आता भाजपात प्रवेश केलेले बबनराव पाचपुते यांनीही गेली पंधरा वर्षे वारी चुकवली नाही. सपत्नीक पायी वारी करत आहेत. वारी काळातही त्यांनी वारीच्या वाटचालीबरोबर सकाळचा व्यायाम आणि मॉर्निंग वॉक चुकविला नाही. परभणीतील सेनेचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनीही गेली पंधरा वर्षे वारीची वाटचाल केली. 

माजी मु्ख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही जेजुरी ते वाल्हे असा युतीचे सरकार असताना आणि त्यापूर्वी आघाडीचे सरकार असताना एक वर्षे वारीचा प्रवास केला होता. दिवंगत माजी मंत्री विमल मुंदडा याही फलटणच्या पुढील प्रवासात पायी चालल्या. खासदार सुप्रिया सुळे यांनीही माउलींच्या आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात नित्याने भाग घेवून कधी हातात टाळ तर कधी डोक्यावर तुळस घेत काही अंतराचा प्रवास केला. खासदार पूनम महाजन याही मागील दोन वर्षांपूर्वी लोणंद ते तरडगाव पायी वारी करत चांदोबाचा लिंब येथील उभ्या रिंगणाचा आनंद घेतला. माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील हेही पायी चालत होते. दर्शनाच्या रांगेतही साधे कपडे घालून दर्शन घेत होते. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील, विजयबापू देशमुख, माजी मुख्यमंत्री सुशालकुमार शिंदे, रणजितसिंह मोहिते पाटील ही मंडळी पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला की स्वागताला चुकले नाहीत. 

दिवंगत नेत्यांपैकी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना सर्वाधिक वेळा पांडुरंगाच्या महापुजेचा मान मिळाला. फडणवीस यांना त्यांच्या कारकिर्दीत एकदा महापूजेचा मान मिळू शकला नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख