जळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या ‘कृत्याच्या सीडी’ बाबत आता जिल्हयात जोरदार चर्चा सुरू आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी त्यांनी ‘इडी’लावली कि आपण ‘सीडी’लावू असे जाहीर केले होते. त्यानंतर काल महाजन यांच्यावर मारहाणीची तक्रार करणारे अॅड. विजय पाटील यांनी त्या ‘कृत्याची सीडी’आपल्याकडे असल्याचे सांगितले.
जामनेरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनीही महाजन यांच्या ‘कृत्याची सीडी’आपल्याकडे आहे, महाजन टायगर बनून आले कि ती सीडी आपण जनतेसमोर आणू असा इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे.
माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी जामनेर येथे पत्रकार परिषद घेवून गिरीश महाजन यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले, तसेच या प्रकरणी तक्रार दाखल करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. यावेळी त्यांनी महाजन यांच्या ‘कृत्याची सीडी’आपल्याकडे असल्याचे सांगितले. पत्रकारासमोर त्यांनी ‘सीडी’ व ‘पेन ड्राईव्ह’दाखविले. गिरीश महाजन यांनी आपण ‘टायगर बनून येणार आहोत’ असे जाहीर केले आहे. ते टायगर बनून आले कि आपण ही सीडी जनतेसमोर दाखविणार आहोत, असेही ललवाणी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या अगोदर जामनेर तालुक्यातील महाजन यांचे एकेकाळचे सहकारी प्रफुल्ल लोढा यांनीही महाजन यांच्या कृत्याची सीडी आपल्याकडे असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. त्यानंतर एकनाथराव खडसे यांनीही त्यांनी ‘इडी’लावली कि आपण ‘सीडी’लावू, असे मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतांना सांगितले होते. त्यामुळे आता त्या‘सीडी’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी जामनेर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले कि राज्यात सुडाच्या राजकारणाची सुरूवात जामनेर येथून संपूर्ण महाराष्ट्रात गिरीश महाजन यांनीच केली आहे. सत्ताकाळात महाजन दबाव आणून अनेक विरोधकावर गुन्हे दाखल केले आहेत. शैक्षणिक संस्थाच्या जमीनीही बळकावल्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.
ते म्हणाले, माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अॅड. विजय पाटील यांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर महाजन म्हणतात, हे सुडाचे राजकारण आहे. महाजन यांना आता सुडाचे राजकारण दिसत आहे काय? त्यांच्यावर खरा गुन्हा दाखल झाला तर ते ओरड करीत आहेत. मात्र त्यांनी जामनेर येथे अनेकांना छळले आाहे. शैक्षणिक संस्थेच्या जमीनीसाठी अनेक संचालकांवर दबाव आणून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. एवढेच नव्हे तर जामनेर तालूका एज्युकेशन सस्थेची जमीन आपल्या ताब्यात यावी यासाठी संस्थेच्या संचालकांना धमकाविले आहे. पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्या गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या आहेत.
अनेक जमीनी आपल्या नातेवाईक व मित्राच्याच्या नावावर कमी किमतीत घेतल्या आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर ते तीन वर्षापूर्वीचा गुन्हा आज कसा दाखल झाला असे ते म्हणतात, मग या अगोदर त्यांनीच आमच्यावर दहा वर्षापूर्वीचे गुन्हे दाखल केले आहेत. विशेष म्हणचे हे सर्व खोटे गुन्हे पोलिसावर दबाव आणून दाखल केले आहेत. अत्यंत खालच्या थरातील सुडाचे राजकारण त्यांनी केले आहे. जामनेर येथून त्यांनीच या राजकारणाची सुरूवात करून संपूर्ण राज्यात त्यांनी हेच केले आहे. त्यांच्या सर्व संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी आपण करीत आहोत. याबाबत आपण आयकर अधिकाऱ्यांनाही पत्र देणार असल्याचे ललवाणी यांनी सांगितले.