परमबीरसिंग यांचा आता अनिल देशमुखांच्या मुलावर दलालीचा आरोप - Parambir Singh now accuses son of Anil Deshmukh in police transfers | Politics Marathi News - Sarkarnama

परमबीरसिंग यांचा आता अनिल देशमुखांच्या मुलावर दलालीचा आरोप

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 22 मे 2021

न्यायालयाचा परमबीरसिंग यांना तात्पुरता दिलासा... 

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध आरोप करण्याचा सपाटा कायम ठेवला असून त्यांनी आता देशमुख यांच्या चिरंजीवांना यांना लक्ष्य केले आहे. परमबीरसिंग यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात बाजू मांडताना त्यांचे वकील महेश जेठमलानी यांनी पोलिस बदल्यांच्या दलालीत अनिल देशमुख यांच्या मुलाचा समावेश होता, असा सनसनाटी आरोप केला. (Parambirsingh accuses son of Anil Deshmukh)

परमबीरसिंग यांच्याविरोधातील अॅट्रोसिटीचा गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी शुक्रवारी (ता. 21 मे) रात्री उशिरापर्यंत न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती एस. जे. काथवाला आणि न्यायमूर्ती एस. पी. तावडे यांच्या खंडपीठासमोर रात्री उशिरा सुनावणी झाली.

ही बातमी पण वाचा : बरोबर रात्री बाराच्या ठोक्याला परमबीरसिंग यांना अटकेपासून संरक्षण मिळाले

या वेळी सरकारी पक्ष आणि परमबीरसिंग यांच्या वकिलांत जोरदार युक्तिवाद झाला. या वेळी जेठमलानी यांनी बाजू मांडताना महाराष्ट्रातील पोलिस दलाची काय अवस्था झाला आहे, असा मुद्दा मांडला. पोलिस बदल्यांमध्ये दलाली करणाऱ्या लोकांना अडकविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. इतरांसह देशमुख यांचा मुलगाही यात दलाली करत होता, असा आरोप या वेळी बोलताना केला. परमबीरसिंग यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबद्दल त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. ते स्वतः या साऱ्या प्रकाराला साक्षीदार आहेत. देशमुख यांच्याविरुद्ध आऱोप केल्यानंतर त्यांच्यावर सूड उगविण्याचे पूर्ण जोमाने प्रयत्न सुरू आहेत. या केसमध्ये अप्रामाणिक कोण आहे, याचे उत्तर गुन्हा दडपण्याचा प्रयत्न करणारे राज्य सरकार आहे. अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करणारे पोलिस निरीक्षक घाडगे यांनी आपण एससी/एसटी असल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये कोठेही केलेला नाही. पण परमबीरसिंग आहेत ना मग करा अॅट्रोसिटिचा गुन्हा दाखल, अशी ही वृत्ती आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणालाचा स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडणारे खंबाटा यांनी जेठमलानी यांचा युक्तिवाद खोडून काढताना विविध मुद्दे मांडले. पोलिस निरीक्षक घाडगे यांनी आपण विशिष्ट जातीचे असल्याने परमबीरसिंग यांनी आपल्याला हिन वागणूक देऊन विविध गुन्ह्यांत अडकविल्याचे तक्रारीत विविध ठिकाणी म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी जातीचा मुद्दा तक्रारीत मांडला नसल्याचा मुद्दा चुकीचा आहे. तसेच घाडगे यांनी ही तक्रार आताच केलेली नाही. गेली पाच वर्षे ते हा मुद्दा मांडत आहेत. त्यामुळे सूड उगविण्याचा प्रश्नच येत नाही. परमबीरसिंग यांच्याविरोधात हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे याबाबत कारवाई व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकेपर्यंत रात्राचे बारा वाजले होते. त्यामुळे पुढील सुनावणी सोमवारी सकाळी ठेवत न्यायालयाने परमबीरसिंग यांना तोपर्यंत अटक करू नये, असा आदेश देत कामकाज थांबविले. 

ही पण बातमी वाचा : परमबीरसिंग खूनशी आणि भ्रष्टाचारी

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख