भाजपकडून आयारामांना पायघड्या; निष्ठावंतांना नारळ !  

निष्ठावंतांना मात्र घरी पाठविल्याचे दिसते.
Narayan Rane, Bharti Pawar, Kapil Patil will be sworn in as Union Ministers
Narayan Rane, Bharti Pawar, Kapil Patil will be sworn in as Union Ministers

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज (ता. ७ जुलै) सायंकाळी होत आहे. त्यात सुमारे 43 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार असून महाराष्ट्रातून चौघांची वर्णी लागली आहे. दुसऱ्या टर्ममधील मंत्र्यांची नावे पाहता बहुतांशी खासदार हे दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत. भाजपने आयारामांना संधी देताना निष्ठावंतांना मात्र घरी पाठविल्याचे दिसते. यामध्ये राज्यातील संजय धोत्रे यांचा समावेश आहे. (Narayan Rane, Bharti Pawar, Kapil Patil will be sworn in as Union Ministers)

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातून राज्यसभा सदस्य नारायण राणे, भागवत कराड, तर भिवंडीचे खासदार कपिल पाटील, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भारती पवार यांची वर्णी लागली आहे. यातील भागवत कराड वगळता इतर तिघे इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून ज्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे, त्यातील बहुतांश हे आयाराम आहेत. 

नारायण राणे हे मूळचे शिवसेनेचे आहेत. शिवसेनेत असताना त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात जाणे पसंत केले होते. त्यावेळी त्यांना काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, काँग्रेस पक्षाकडून त्यांना मुख्यमंत्रीपद काही देण्यात आले नाही, त्यामुळे त्यांनी पक्षश्रेष्ठींवर तोफ डागत भाजपत जाणे पसंत केले. भाजपने त्यांची राज्यसभेवर निवड करत अवघ्या दोन वर्षांत केंद्रीय मंत्रीपदावर वर्णी लावली आहे. 

राणे यांना संधी देण्यामागे शिवसेना विरोध हा महत्वाचा मुद्या आहे. तसेच, कोकणात कमजोर असलेला भारतीय जनता पक्ष मजबूत करणे हाही हेतू आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक आणि राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पाहता राणेंसारखी तुफानी तोफ हाती ठेवणे देवेंद्र फडणवीस पसंत केले असावे. त्यांच्या मंत्रीपदाचा आगामी निवडणुकांमध्ये भाजपकडून नक्कीच फायदा करून घेतला जाईल. मराठा आरक्षणाच्या प्रश्नातही रान पेटविण्यासाठी राणे यांचा भाजपला उपयोग होऊ शकतो.  

दुसरीकडे, भिवंडीचे खासदार कपिल पाटील हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत भिवंडीतून लोकसभेची निवडणूक लढवली होती. ती निवडणूक ते मोठ्या फरकाने जिंकले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले संबंध पाटील यांच्या पथ्यावर पडले आहेत. तसेच, शिवसेनेच्या बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजप मजबूत करणे हेही एक कारण पाटील यांना संधी देण्यामागे असू शकते. तसेच, ओबीसी आरक्षणासंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर आगरी समाजातील कपिल पाटील यांना संधी देणे सूचक मानले जात आहे.

दिंडोरीच्या खासदार भारती पवार ह्याही पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्याच. दिंडोरीच्या उमेदवारीवरून पवार घराण्यात निर्माण झालेल्या वादातून त्यांनी भाजपमध्ये जाणे पसंत केले. भाजपने विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे तिकिट कापून भारती पवार यांना दिले. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी विजय मिळवत सध्या केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान पटकावले आहे. 

महाराष्ट्रातून केवळ भागवत कराड या निष्ठावंताला भाजपने मंत्रीपदाची संधी दिली आहे. त्यातही कराड यांना संधी देऊन मुंडे गटाला शह देण्याची खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com