नागपूर : परळी येथे राहणारी पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने रविवारी रात्री पुणे येथे आत्महत्या केली. शिवसेनेच्या विदर्भातील एका मंत्र्याची ती प्रेयसी होती, अशी चर्चा त्यानंतर वाऱ्याच्या वेगाने राज्यभर पसरली. आता या प्रकरणात आणखी एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या क्लिपमध्ये मंत्री आणि अरुण राठोड नामक इसमाचे संभाषण असल्याचे सांगितले जात आहे. ‘...तर मला आता जीव द्यावा लागेल’, असे संभाषणाच्या शेवटी मंत्री म्हणाल्याचा दावा केला जात आहे. तसेच या तरुणीचा मोबाईल ताब्यात घ्या, असेही हा मंत्री संबंधिताला सांगत असल्याचे ऐकू येत आहे.
मी स्वतः टेन्शनमध्ये आहे, असेही वाक्य हा मंत्री बोलत असल्याचे ऐकू येत आहे. आधीच घरचे टेन्शन आणि आता हे, असा संवाद आहे. काही बाबी मराठीत तर काही बंजारा बोलीत आहेत.
पूजाच्या आत्महत्येचे गूढ दिवसागणिक वाढत चालले आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर अनेक तर्क मांडण्यात येत आहे. मंत्र्यासोबतच्या संबंधातून आलेल्या तणावाने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मात्र पोलिसांनी त्यास दुजारा दिलेला नाही. सोरायसीस आजारामुळे कंटाळल्याने आत्महत्या केल्याचे तिच्या पालकांनी पोलिसांना सांगितले आहे.
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये ट्रीटमेंट करण्याबाबत संबंधित मंत्री आणि राठोड यांच्यात संवाद आहे. ते नेमके कुठल्या ट्रिटमेंटबद्दल चर्चा झाली, याचे गूढ उकलण्याचा प्रयत्न आता केला जात आहे. आज व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये दोन व्यक्तींचे बंजारा भाषेतील संभाषण आहे, ज्यामध्ये एक तरुणी आत्महत्येचा विचार करतेय असे संभाषण आहेत. तो आवाज संबंधित मंत्र्याचा असल्याचा दावा केला जात आहे. या व्यक्ती कोण आहेत? अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, या ऑडिओचा फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावरच त्याची सत्यता समोर येईल.
या ऑडिओमध्ये एक व्यक्ती संबंधित मंत्र्याला ''तरुणीच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार येत आहे'' असे सांगत आहे. यावरून तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्यक्ती तिच्या सोबत होता आणि दुसऱ्या व्यक्तीला माहिती देत होता. तसेच संबंधित व्यक्तींना ती तरुणी आत्महत्या करणार असल्याची माहिती होती. त्यावर, ''त्या तरुणीला समजावून सांगा'' असेही तरुणीसोबत असलेला व्यक्ती फोनवरील व्यक्तीला सांगत होता. त्यावर फोनवरील दुसरी व्यक्ती ''तिला डॉक्टरकडे घेऊन जा'' असे सांगते. त्यानंतर,''तुम्ही सांगत असाल तर मी डॉक्टरकडे जाते, पण नंतर मी आत्महत्या करणार'' असे तरुणी म्हणतेय असे तो व्यक्ती सांगत आहे. दरम्यान या दोन व्यक्तींमधील बंजारा भाषेतील संवादाचे आणखी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल समोर आले आहे. या ऑडिओ क्लिपवरुन तरुणीने आत्महत्या केल्यानंतर तिच्यासोबत एक व्यक्ती तिथेच होता. त्या व्यक्तीला मंत्री असलेली व्यक्ती ''तिचा मोबाईल काढून घे'' असे सांगत आहे.
ही ऑडिओ क्लिप पुजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंधित असल्याची चर्चा सुरू आहे. ही ऑडिओ क्लिप खरी आहे का, याची तपासणी होईलच. पण तोपर्यंत या 22 वर्षाच्या पूजाने आत्महत्या का केली असेल? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पुण्यात वास्तव्यास असेलल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून या तरूणीने आत्महत्या केल्याची घटना महमदवाडी येथे उघडकीस आली. ही घटना रविवारी मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास घडली.
वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिपक लगड यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ महिन्यापूर्वी ही तरुणी पुण्यात स्पोकन इंग्लीशच्या क्लासेसाठी आली होती. रात्री दिड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला. आई-विडीलांचा जबाब घेतला असता त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही. मात्र ती सोरायसीस या आजाराने त्रस्त असल्याने तिने आत्महत्याचे पाउल उचलले असावे. घटनास्थळी सुसाईड नोट आढळून आली नाही.
या प्रकारानंतर भाजपने या आत्महत्येच्या मुद्यावरून चौकशीची मागणी केली आहे. या तरुणीच्या सोशल मिडियातील विशेषतः फेसबुकवरील पोस्ट पाहिल्यानंतर अनेक बाबी समोर येतात.
डिसेंबर 2018 मध्ये टाकलेल्या पोस्टमध्ये ही तरुणी म्हणते ``मी माझे काम नाही सोडणार. पण मी कोणाची कार्यकर्ती नाही. ना कोणत्या पक्षात आहे. माझे कोणासोबतही भांडण झालेले नाही. फक्त पक्ष किंवा कोणत्या व्यक्तीसोबत मला माझ नाव जोडून नाही घ्यायच.``
त्यानंतर काही दिवसांत संबंधित मंत्र्यासोबतचा वेगळा फोटो फेसबुकवर शेअर केलेला आहे. दोघेच त्या फोटोत बसलेले दिसत आहेत. या फोटोवरील कॅप्शन मात्र बुचकळ्यात टाकणारी आहे.
जो हूआ सो हूआ, ये जंग लडना मैं ना छोडूंगी...
घायल शेरनी हूॅ, दूगनी ताकत के साथ लौटूंगी
असा शेर या तरुणीने कॅप्शन म्हणून टाकलेला आहे. त्यामुळे त्याचा नक्की अर्थ काय, हे कोडेच आहे.
त्या मंत्र्याला निवेदन देतानाही फोटो फेसबुकवर दिसून येत आहे. हा मंत्री आपल्या समाजाचे भूषण आहे, असे मत व्यक्त करत अनेक विशेषणे त्या मंत्र्याला लावली आहेत. त्या खाली एक महत्वाची टीप म्हणून ओळ टाकलेली आहे. संबंधित मंत्री आणि त्या तरुणीच्या भेटीवरून कोणताही अर्थ काढू नये, असे त्यात म्हटले आहे. (टिप- काही कामानिमित्त भेट - जास्त बुद्धीचालकाने वेगळा अर्थ काढू नये, असे हे नेमके वाक्य आहे.)
ही तरुणी मूळची बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील आहे. विदर्भातील हा मंत्री संबंधित तरुणीच्या घरीही गेला होता. तो मंत्री आणि तिच्या घरातील इतर व्यक्तींसोबतचा फोटोही फेसबुकवर आहे. त्यावरील फोटो ओळ वेगळी आहे. `भीड में सभी लोग अच्छे नही होते और अच्छे लोगों की भीड नही होती,`असे त्या फोटोवर म्हटले आहे.
2019 या वर्षाच्या अखेरीस एक पोस्ट संबंधित तरुणीने लिहिली आहे. त्यात म्हटले आहे की
``आज या वर्षाचा शेवट होतोय. या वर्षाच्या शेवटी माझ्या आयुष्यात बर्याच वाईट व बर्याच चांगल्या गोष्टी घडल्या. पण प्रत्येक वेळी मला अनुभव मिळाला. या वर्षी मला भरपूर निःस्वार्थ प्रेम पाठबळ मिळत आहे नेहमी मिळत रहावे.धन्यवाद सर्वांचे. मी आपल्याला शब्द देते मी कोणाच्याही विश्वासाला तडा न जाऊ देता होईल तेवढी साथ देईल. सर्वाच्या होईल तेवढी कामी येईल. या वर्षी संघर्षातून मला माझ्याअडचणीतून मार्ग काढता आला आणि मला आनंद आहे मला कुठेतरी स्वतः ला सिद्ध करता आले. आईवडीलांच्या मी कामी आले. बरेच चांगलेवाईट अनुभव आले. काही लोक लांबली. त्याहुन चांगली माणसं माझ्या आयुष्यात आली आणि मला प्रत्येक वेळी सावली सारखी साथ देणाऱ्या माझ्या सर्व जिवाभावाच्या भावंडांना, मित्रमैत्रिणींना धन्यवाद, मी आपली नेहमी आभारी असेन. कधी चुकून कोणाच्या भावना माझ्याकडुन दुखावल्या गेल्या असतील मी क्षमस्व आहे. मोठ्या मनाने मला माफ करा, असे या तरुणीने म्हटले आहे. माझे कधी कोणासोबत भांडण झाले असेल त्यात चूक कोणाचीही असू द्या. मी माफी मागते. नवीन वर्षाची नवीन सुरुवात करू, ही अपेक्षा व्यक्त करते.``
या तरुणीने 2020 आणि 2021 मध्ये मात्र या मंत्र्यासोबत एकही फोटो शेअर केलेला नाही. तिच्या मृत्यूच्या वेळच्या आॅडिओ क्लिपने मात्र खळबळ उडाली आहे.
Edited By : Atul Mehere

