भविष्य विचारण्यासाठी येणाराच्या प्रेयसीचे नावही म्हणे मनोहरमामा सांगायचा...

स्वतः अटक होणार, हे मात्र त्याला कळाले नाही..
Manoharmama
Manoharmama

पुणे : उंदरगाव (ता करमाळा )येथील मनोहर भोसले (Manoharmama Bhosale) या भोंदू महाराजाचा गेल्या पाच- सहा वर्षांंतील प्रवास सर्वांनाच थक्क करणारा आहे. अतिशय गरीब परिस्थितीत झोपडीत राहणारा मनोहर भोसले सहा वर्षांत कोट्यवधी रुपयांचा मालक झाला. डीएड केल्यानंतर नोकरी लागत नाही म्हटल्यानंतर सुकट -बोंबील आणि भाजीपाला विकणारा मनोहर भोसलेला असा कोणता साक्षात्कार झाला की तो पाच -सहा वर्षांत कोट्यवधीचा मालक झाला. तो कोट्यवधी रुपयांचा मालक होण्यास अनेक उद्योजक, राजकीय मंडळी आणि अधिकारी  कारणीभूत आहेत.

आपले भविष्य पाहण्यासाठी येथे येणारे उद्योजक,राजकीय मंडळी ,धनदांडग्या लोकांनी  महाराजांना लाखो रुपयांच्या देणग्या देण्यास सुरुवात केली. येथे जाणाऱ्या काहींशी बोलल्यानंतर त्याच्या कथित भविष्य सांगण्याच्या पद्धतीचा उलगडा झाला. नोकरी लागत नाही म्हटल्यावर तो पश्चिम बंगालमध्ये जाऊन जादूटोणा शिकून आल्याची चर्चा होती. त्यामुळे अनेकजण आधीपासूनच नमून जात होते. अनेकांनी त्याच्या वहीचा किस्सा सांगितला. तो समोर आलेल्या माणासाचे वर्णन लिहून घेत त्याचा भूतकाळ सांगत असे, असा दावा केला जातो. काहींच्या म्हणण्यानुसार समोर बसलेल्यांच्या प्रेयसीचे नावेही तो सहज सांगायचा. आपल्या प्रेयसीचे नाव या महाराजाला कसे काय कळाले, असे समजून समोरचा अचंबित व्हायचा.

पण त्याचेही भ्रमजाल ठरलेले असायचे. त्याच्याकडे 25 हजार रुपयांची पावती फाडतानाच आधार कार्ड आणि पॅन कार्ड क्रमांक ग्राहकांकडून लिहून घेतला जात होता. ही रक्कम भरल्यानंतर एक ते दोन तासांनी नंबर यायचा. तोपर्यंत महाराजाचे म्हणून तेथे फिरणारे पित्ते आपला भूतकाळ महाराजांनी कसा सांगितला, आपल्याला कसा गुण आला हे सांगत फिरायचे. गिऱ्हाईकांशी ते गप्पा मारत त्याची माहिती काढून नंतर महाराजाकडे गुपचूप द्यायचे. ग्राहक एक-दोन तासाने समोर जाईपर्यंत त्याची माहिती महाराजापर्यंत गेलेली असायची. ग्राहकाला वाटायचे की महाराजाला काहीच माहीत नसताना त्याने आपला पॅन कार्ड क्रमांक सांगितला, आधार कार्डही सांगितला, असा भ्रम व्हायचा. ग्राहकाने महाराजांच्या कथित भक्तांजवळ केलेली चर्चा आपसूक महाराजाच्या कानात आधीच पोहोचलेली असायची. त्या आधारे महाराज एक-दोन घटना किंवा अंदाजपंचे काहीतरी ठोकून द्यायचा. योगायोगाने त्या खऱ्या ठरल्या की गिऱ्हाईत प्रभावित व्हायचे. असे फसलेले गिऱ्हाईक महाराजाचा कथित महिमा गायचे. त्यातून आणखी गिऱ्हाईक मिळत जायचे, अशी सगळी साखळी निर्माण झाली होती.  त्यातून उंदरगाव येथे  उद्योगपती, राजकिय नेते, अधिकारी यांची मोठ्या प्रमाणात वाढली. यातील अनेक जण अवैध व्यवसाय, लाचखोरी, फसवाफसवी यात अडकलेले असल्याने त्यांना महाराजाचा आधार वाटू लागला होता. पण तो तकलादू होता, हे लगेच लक्षात आले. इतरांचे भविष्य सांगणाऱ्या मनोहरला आपण अटक होणार, हे कसे कळाले नाही, असा साधा प्रश्न या मंडळींना अजूनही पडला नाही, याचेच आश्चर्य वाटते.

मनोहर भोसलेने वडीलांच्या नावे असलेल्या दिड एकर शेतीत झोपडी बांधून भविष्य पहााण्यास सुरवात केली.वडीलांची दिड एकर आणि  जमीन मनोहर भोसले यांने एक एकर जमीन  विकत घेतली. असे सध्या अडीच एकर शेतात त्यांने आपला मठ बांधकाम सुरू आहे. येथे भव्य असे बाळुमामाचे मंदीराचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. तर भक्तीनिवासचे बांधकाम सुरू आहे असुन ते बांधकाम प्राथमिक अवस्थेत आहेत.

आज जे तक्रारदार आहेत तेही ऐकेकाळी मनोहर भोसले सोबत होते आणि मनोहर भोसलेसाठी त्यांनीही काहींशी दोन हात केल्याचे असल्याचे परिसरातील लोक सांगत आहेत. येथील पार्किंगचा मुद्दा व इतर अर्थिक तडजोडी वरून हे प्रकरण महाराजाचे भिंग फुटले आहे. मनोहर भोसलेच्या वाढ असलेल्या प्रस्थाला धक्का बसवण्याचे काम त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनीच केले आहे.

भोसले यास पोलिसांनी अटक केल्यानंतर अनेक नेतेमंडळींनी आपला त्याच्याशी संबंध नसल्याचे  सांगण्याचा  प्रयत्न केला आहे. मात्र त्याचवेळी सोशल मिडीयातून वेगवेगळे नेत्यांचे मनोहर मामाबरोबर फोनचे फोटो सोशल मिडीयात व्हायरल होयचे अजूनही थांबलेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com