लातूर : माजीमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्या "फेसबूक लाईव्ह"च्या माध्यमातून शिवजयंती बाबत राज्य सरकारच्या अध्यादेशाला थेट आव्हान दिले आहे, त्याला महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. कायदेशीर कारवाई झाल्यास शिवप्रेमींच्या पाठीशी आपण असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजे एक स्फूर्तिदायी आणि प्रेरणादायी सण-उत्सव म्हणून सबंध महाराष्ट्रात साजरा होत असतो. ज्यांनी महाराष्ट्र घडविला अशा आदर्श राजाचा जन्मोत्सव ही महाराष्ट्रातील पिढ्यानपिढ्या साजरी केली जाणारी परंपरा आहे. पण नुकताच राज्य सरकारने कोव्हिड- १९ च्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साजरी करण्यासाठी काही अटी असलेला अध्यादेश काढला होता. साधेपणाने, अतिशय मर्यादित संख्येने शिवजयंतीमध्ये सहभागी होण्याच्या जाचक अटीमुळे महाराष्ट्रभर शिवप्रेमी हताश झाले होते. अनेक ठिकाणी भव्य कार्यक्रमांची तयारी झाली होती, त्या सर्व तयारीवर राज्य सरकारच्या अटींनी पाणी फिरवले आहे.
माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी थेट राज्य सरकारच्या या अध्यादेशाला आव्हान देत त्याला जाहीरपणे धुडकावले आहे. शिवप्रेमींनी अध्यादेशाचा विचार न करता तेवढ्याच उत्साहात शिवजयंती साजरी करावी, कायदेशीर कारवाईची भीती बाळगू नये, तसेच "जर काही कारवाई झालीच तर त्याचे काय करायचे ते मी पाहून घेतो" असे सांगून शिवप्रेमींना पाठबळ दिले.
गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी पुन्हा सक्रिय होणार; या पदांवर संधी https://t.co/iiZLKJYQAS
— Sarkarnama (@SarkarnamaNews) February 15, 2021
शिवप्रेमींची जय्यत तयारी पुन्हा सुरू...
महाराष्ट्रात अनेक मोठ्या राजकीय नेत्यांचे वाढदिवस, पदग्रहण समारंभ अशा कार्यक्रमांना ठाकरे सरकार सर्रास परवानगी देत आहे, तिथे तुडुंब गर्दी होत आहे. लोकल, बस, बार, मुंबई मधील नाईट लाईफ, दारूची दुकाने हे सुरू करण्यात आले असून अशी गर्दीची ठिकाणे सरकारला चालतात परंतु शिवजयंतीसाठी मात्र अटी लादल्या जातात. राज्य सरकारच्या दुटप्पी भूमिकेमुळे महाराष्ट्रभर नाराजी व राग व्यक्त होत होता. लोकांच्या या भावनांना संभाजी पाटील निलंगेकर यांनी वाट मिळवून दिली आहे. कायदेशीर कारवाईची जबाबदारी त्यांनी स्वीकारली असल्याने महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींनी जय्यत तयारी पुन्हा सुरू केल्याचे दिसून येत आहे. पुन्हा एक उत्साहाची लाट येऊन कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.

