`भाजप सोडणाऱ्या नगरसेवकांना अपात्रतेपासून देवही वाचवू शकणार नाही` - God will also not save those corporators from disqualification who defected from BJP | Politics Marathi News - Sarkarnama

`भाजप सोडणाऱ्या नगरसेवकांना अपात्रतेपासून देवही वाचवू शकणार नाही`

कैलास शिंदे
शनिवार, 5 जून 2021

महाजन यांचा स्पष्ट इशारा 

जळगाव : भारतीय जनता पक्षातून (BJP) फुटून शिवसेनेत जळगाव महापालिकेचे नगरसेवक गेले आहेत. मात्र आता या नगरसेवकांना अपात्रतेपासुन मंत्री नव्हे, देवही वाचवू शकणार नाही. असा सणसणीत इशारा भाजप नेते माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी दिला आहे. (Girish Mahajan Warns bjp corporators)

जळगाव महापालिकेचे  भारतीय जनता पक्षाचे मोठ्या प्रमाणात फुटून शिवसेनेत गेले आहेत, अजूनही काही नगरसेवक जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे. भाजपकडून ही गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, पक्षाचे नेते आमदार गिरीश महाजन यांनी नगरसेवकाची बैठक घेऊन चर्चा केली होती, मात्र तरीही काही नगरसेवक जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

या बाबतीत  भाजप नेते गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही आता कोणालाही थांबविणार नाही,जे जातील आणि जे गेले आहेत ते नगरसेवक अपात्र ठरतील, आम्ही आता त्या बाबतीत अत्यंत कठोर भूमिका घेत आहोत.या नगरसेवकांना अपात्र करण्याची कारवाई आम्ही करणार आहोत,या नगरसेवकांना वाटत असेल की मंत्री आपणास वाचवतील. परंतु त्यांना या कारवाई पासून आता मंत्रीच काय देवही वाचवू शकणार नाही. ते अपात्र होतीलच आणि ते पुढची निवडणूकही लढवू शकणार नाही. पक्षातर्फे या बाबतीत आता अत्यंत खंबीर पाऊले उचलण्यात येत आहेत, अपत्रातेची ही केस सर्व तांत्रिक आंगाने पक्की करण्यात येत आहे, लवकरच या नगरसेवकांना नोटीस येईल, असेही त्यांनी सांगितले.

जळगाव महापालिकेत शिवसेनेने करेक्ट कार्यक्रम केला होता. त्यातून भाजपची येथील सत्ता गेली होती. या पक्षांतराच्या वेळी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. महाजन यांच्या या इशाऱ्यानंतर तरी भाजपमधील गळती थांबणार की पक्षाला आणखी हादरे बसणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सांगली येथेही पक्षाला अशाच प्रकारे सत्ता गमवावी लागली होती.

वाचा ही बातमी : 18 जिल्ह्यांना दिलासा; राज्यातील लाॅकडाऊन अखेर शिथिल

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख