चांगली बातमी : पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस दाखल, नागपूरला तीन आणि नाशिकला चार टॅंकर - first oxygen train reaches in Maharashtra today | Politics Marathi News - Sarkarnama

चांगली बातमी : पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस दाखल, नागपूरला तीन आणि नाशिकला चार टॅंकर

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

देशाच्या अन्य भागांत ऑक्सिजन वाहून नेण्याच्या दृष्टीने हा पथदर्शी उपक्रम ठरणार आहे.

नागपूर : कोरोना काळात सर्व ठिकाणांहून नकारात्मक बातम्या असताना एक चांगली घटना महाराष्ट्रासाठी घडत आहे. राज्य सरकार, रेल्वे यांच्यामार्फत उपलब्धतेसाठी  युद्धपातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. विशाखापट्टणम येथून प्राणवायू घेऊन निघालेली पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस शुक्रवारी रात्री ८.१५ वाजता नागपूर स्टेशनवर दाखल झाली. एकूण शंभर मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन असलेले सात टँकर घेऊन पोहोचलेल्या या गाडीतून नागपुरात ३ टँकर उतरविल्यानंतर ही एक्स्प्रेस नाशिकच्या दिशेने रवाना झाली.

कोरोना रुग्णावर उपचारासाठी राज्य सरकारकडून परराज्यातून ऑक्सिजनची जुळवाजुळव करण्यात येत आहे. भारतीय रेल्वेच्या रो-रो सेवे अंतर्गत विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन वाहून आणण्यासाठी रिक्त मालगाडी पाठविण्यात आली. सोमवारी रात्री कळंबोली येथून १६ टन क्षमतेचे सात रिकामे टँकर घेऊन पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना झाली होती. गुरुवारी सकाळी विशाखापट्टणमला पोहोचली. तेथील स्टील प्लांट सायडींगमधून सात टँकरमध्ये वैद्यकीय उपयोगाचा प्राणवायू घेऊन ही ट्रेन शुक्रवारी रात्री नागपूर स्थानकाच्या फलाट क्रमांक आठ वर पोहोचली. टँकर उतरवून घेण्यासाठी पूर्वीच रॅम्प तयार करण्यात आला होता. स्थानिक प्रशासकीय अधिकारी व रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रॅम्पवरून तीन टँकर येथे उतरवून घेण्यात आले. त्यानंतर चार टँकर घेऊन ही एक्प्रेस नाशिकच्या दिशेने रवाना झाली. शनिवारी सकाळपर्यंत ती नाशिकला पोहोचण्याची शक्यता आहे.

अवघा महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनच्या तुटवड्याचा सामना करीत आहे. ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांवरील उपचारातही मर्यादा आल्या आहेत. ऑक्सिजनची पर्यायी जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. पण, त्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. अशावेळी रेल्वेने पोहोचणारा ऑक्सिजनचा साठा रुग्णावर उपचारासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. एवढेच नाही तर गरजेनुसार देशाच्या अन्य भागात ऑक्सिजन वाहून नेण्याच्या दृष्टीने हा पथदर्शी उपक्रम ठरणार आहे.

गेल्या वर्षीही लॉकडाऊनमध्ये रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली आणि पुरवठा साखळी कायम ठेवली आणि आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्राची सेवा सुरू ठेवली आहे, अशी प्रतिक्रिया रेल्वे मंत्रालयाने व्यक्त केली.

दुसरीकडे  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोविड केसेसमध्ये  तीव्र वाढ झाल्याने उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि वैद्यकीय उद्देशाने ऑक्सिजन पुरवठा वाढविण्यासाठी विविध उपायांचे निर्देश दिले. तज्ज्ञ गटांना  राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना ऑक्सिजन वाटप सुरळीत  करण्याचे निर्देश दिले. ऑक्सिजन वाहतूक करणार्‍या  वाहनांना पुरेशी सुरक्षा मिळावी आणि वाहतुकीसाठी खास कॉरिडोरची तरतूद करावी यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने आज सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारने काही आवश्यक क्षेत्रांव्यतिरिक्त औद्योगिक उद्देशाने ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास मनाई केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख