मंत्र्यांच्या बंगल्यावर 90 कोटी खर्च झाल्याचा आकडा कोठून आला..अजितदादांचा सवाल.. - the figure of how much was spent on the minister bungalow is not  known Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्र्यांच्या बंगल्यावर 90 कोटी खर्च झाल्याचा आकडा कोठून आला..अजितदादांचा सवाल..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 डिसेंबर 2020

नव्वद कोटी खर्च झाल्याचा आकडा कोठून आला...

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य मंत्र्यांच्या बंगल्याच्या दुरुस्तीवर कोट्यवधीची उधळण करण्यात आली आहे. या मंत्र्यांच्या बंगल्यांवर गेल्या वर्षभरात 90 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप भाजपनं केला आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "मंत्र्यांच्या बंगल्याच्या दुरूस्तीबाबत मी माहिती घेतली आहे. या बंगल्यावर 90 कोटी रूपये खर्च झालेले नाही. या खर्चाचा आकडा अजून आलेला नाही, तर 90 कोटी खर्च झाल्याचा आकडा कोठून आला."

 
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली आहे. अधिवेशनाला जाण्यापूर्वी अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत अजित पवार म्हणाले की मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. आधीपेक्षा जास्त वकील सुनावणीसाठी दिले आहेत. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची सुनावणी सुरू आहे. त्याची तारीख पुढे ढकलली आहे, याबाबत सर्वांना माहिती आहे. तारखेच्या वेळी चांगले वकील देण्याचं काम सरकार करीत आहे. 
 
"गेल्या वर्षभरात सरकारने काय काम केले, हे विरोधकांनी पाहिलंच नाही. हे सरकार कधी पडतंय आणि पडणार याचा मुहूर्त शोधण्यातच त्यांचं वर्ष गेलंय,' अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांना काल फटकारले होते. 

कालच्या पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले, जनतेमध्ये सरकारबाबत नाराजी, असमाधान आहे, असे कुठेही दिसत नाही. विरोधी पक्ष या नावातच विरोध आहे, ते त्या गोष्टीला जागले आहेत. अधिवेशनाबाबत त्यांनी सांगितले की, "अधिवेशनात सहा अध्यादेश पटलावर ठेवली जातील. शोकप्रस्ताव, विधेयक, अर्थसंकल्प असेल. तर पुरवण्या मागण्या, विधेयकांवर चर्चा होणार आहे.' 

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अघोषित आणीबाणी सुरू आहे, असा आरोप केला होता, त्याला उत्तर देताना "राज्यात जर अघोषित आणीबाणी आहे, तर देशात घोषित आणीबाणी आहे का?' असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे. मराठा नेत्यांसोबत आम्ही चर्चा करतोय. सर्वानुमते कोर्टात आम्ही मांडत आहोत. 

हिवाळी आधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जवळपास २५०० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी १७ जण पॅाझिटिव्ह आले आहेत. यामध्ये पोलिसांचा आणि काही विधानभवन कर्मचारी यांचा समावेश आहे. मागील वेळी देखील ५२ जणांची कोरोना पॅाझिटिव्ह होते. मात्र यंदा हा आकडा कमी झाल्याच पाहायला मिळतंय.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख