हिंदूहृदयसम्राटांचा वारसा सांगणाऱ्यांनी टक्केवारीसाठी आता तो निर्णय मागे घेऊ नये - The decision of free vaccination for percentage should not be taken back : Gopichand Padalkar | Politics Marathi News - Sarkarnama

हिंदूहृदयसम्राटांचा वारसा सांगणाऱ्यांनी टक्केवारीसाठी आता तो निर्णय मागे घेऊ नये

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 26 एप्रिल 2021

आमचे कर्तव्य म्हणून मोफत लस देणार आहोत.

मुंबई  ः राज्यातील नागरिकांना कोविडची मोफत लस देण्याच्या श्रेयासाठी महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी याबाबतची घोषणा करताच युवा सेनेचे प्रमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्याबाबतचे ट्विट केले हेाते. मात्र, काही वेळातच ते ट्विट डिलिट केले. त्यावरून भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी आदित्य यांना लक्ष्य केले आहे. वाटाघाटी आणि टक्केवारीसाठी या निर्णय आता मागे घेण्यात येऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,बिघाडी सरकारचे लाडके मंत्री आदित्य ठाकरे यांचे ट्विट वाचून आनंद झाला. पण तो काही क्षणातच विरला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे तुम्ही आहात. ‘ वाटाघाट ʼ आणि ‘टक्केवारीमुळेʼ लोकहितासाठी जाहीर केलेला संपूर्ण महाराष्ट्रासाठी ‘मोफत लसीकरणाचा निर्णय वापस घेऊ नये, हीच अपेक्षा, अशा शब्दांत आमदार गोपीचंद पडळकर यांनी आदित्य ठाकरे यांची खोड काढली आहे.

दरम्यान, राज्यात लसीचा तुटवडा असताना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यातील सर्व नागरिकांना १ मे पासून मोफत लस देण्यात येणार आहे, त्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळात चर्चा झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी तातडीने ट्विट करत राज्यातील नागरिकांना आम्ही आमचे कर्तव्य म्हणून मोफत लस देणार आहोत, असे म्हटले होते. मात्र, काही वेळानंतरच त्यांनी आपले ट्विट डिलिट केले हेाते. त्यावरून आमदार पडळकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काँग्रेसने व्यक्त केली नाराजी

एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये श्रेयासाठी स्पर्धा सुरू असताना काँग्रेस पक्षाने मात्र याबाबत नाराजी व्यक्त करत हा अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा असल्याचे म्हटले आहे. याबाबत बोलताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की मोफत लसीकरणाबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोफत लसीकरणाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना मोफत लस द्यावी, अशी आमची आग्रही मागणी आहे. ती मागणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ती मागणी मान्य होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. 

‘मोफत लस देण्याबाबत मुख्यमंत्री विचार करत असतानाच, श्रेय घेण्यासाठी कोणी हा निर्णय जाहीर करत असेल तर ते चुकीचे आहे. आम्हाला हा प्रकार आवडलेला नाही. काँग्रेस त्यावर नाराज आहे, असेही थोरात यांनी म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख