चंद्रकांतदादांच्या शपथपत्राच्या निमित्ताने कॉंग्रेसचा फडणवीसांवर निशाणा  - Congress targets Fadnavis on the occasion of Chandrakant patil's affidavit case | Politics Marathi News - Sarkarnama

चंद्रकांतदादांच्या शपथपत्राच्या निमित्ताने कॉंग्रेसचा फडणवीसांवर निशाणा 

सरकारनामा ब्यूरो 
शनिवार, 22 ऑगस्ट 2020

कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पाटील यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रतिज्ञापत्र दाखल करताना त्यात संपत्ती आणि दाखल गुन्ह्याबाबत माहिती लपविल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधातील तक्रारीची चौकशी करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. यावरून कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पाटील यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 

पाटील हे कोथरूडचे आमदार आहेत. कोथरूडमधील व्यावसायिक डॉ. अभिषेक हरिदास यांनी पाटील यांच्याविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. त्यात हरिदास यांनी म्हटले आहे की पाटील यांनी ते मालक असलेल्या दोन कंपन्यांची माहिती लपवली आहे. तसेच, 2016 ते 2019 दरम्यान उत्पन्नाच्या स्रोताबाबत खोटी माहिती दिली.

कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलिस ठाण्यात 2012 मध्ये त्यांच्यावर दाखल गुन्ह्यात दोषारोपपत्र सादर झालेले असूनही ते अद्याप सादर झाले नाही, अशी माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. त्याबाबत चौकशी करून 16 सप्टेंबरपर्यत अहवाल न्यायालयात सादर करावा, असे कोर्टाने म्हटले आहे. 

याबाबत चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की ही तक्रार राजकीय सूडबुद्धीने केली आहे, त्यामुळे ती तथ्यहीन आहे. निवडणुकीचा अर्ज भरताना अशी तक्रार करण्यास वाव असतो. अर्ज भरताना, छाननीवेळी आक्षेप नोंदविण्याचा अधिकार असतो. निवडणुकीचा अर्ज भरताना आवश्‍यक ती सर्व माहिती मी दिली आहे. तरीही कोणाला आक्षेप असल्यास उच्च न्यायालयात ते याचिका दाखल करू शकतात. 

दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही दोन फौजदारी गुन्ह्याची माहिती निवडणुकीच्या वेळी सादर करावयाच्या शपथपत्रात दिली नसल्याचा आरोप करण्यात आला होता. नागपूरमध्ये फडणवीस यांच्यावर बदनामी आणि फसवणूक असे दोन गुन्हे दाखल आहेत. फडणवीस यांनी 2014 च्या निवडणूक प्रतिज्ञा पत्रात या दोन्ही गुन्ह्यांची माहिती लपवली आहे, अशी तक्रार ऍड सतीश उके यांनी केली होती. 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निवडणुकीच्या वेळी सादर करावयाच्या शपथ पत्रातील माहितीवरून आरोप-प्रत्यारोप झाले होते. 

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यातील प्रकरणाच्या निमित्ताने कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. याबाबत एक ट्विट करत सावंत यांनी म्हटले आहे की "मोदींच्या पावलावर पाऊल ठेवून शपथपत्रात माहिती लपविणारे आता हे दोघेही.' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख