विधानसभा अध्यक्षाची निवड न केल्याने काँग्रेस श्रेष्ठी नाराज : पटोले, थोरातांकडे होणार विचारणा

काही महत्त्वाच्या नेत्यांना दिल्लीहूनदूरध्वनी करण्यात आल्याचे समजते.
Congress party leader upset over not not taking election of Assembly Speaker
Congress party leader upset over not not taking election of Assembly Speaker

मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही विधानसभेच्या अध्यक्षांची निवड न झाल्याने काँग्रेस पक्षाचे श्रेष्ठी नाराज झाले आहेत. या संदर्भात नक्की काय झाले, त्याची माहिती द्या, असे दूरध्वनी काही महत्त्वाच्या नेत्यांना दिल्लीहून करण्यात आल्याचे समजते. (Congress party leader upset over not not taking election of Assembly Speaker)

आमदारांच्या मतदानाबद्दल विश्वास नव्हता तर, गुप्त मतदानाची अट बदलून नियम समितीत त्यात बदल घडवून आणता आला असता. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता. ६ जुलै) त्यासंबंधी बैठक झाली. ही बैठक आधी का घेण्यात आली नाही? भारतीय जनता पक्षाच्या १२ सदस्यांचे निलंबन झाल्यानंतर विधीमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचा आग्रह का धरला नाही, असे प्रश्नही संबंधित नेत्यांना करण्यात आले आहेत.

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार नाही, हे राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून श्रेष्ठींना कळवण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, मंगळवारी या विषयी नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे सांगण्यात येते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे विचारणा केली जाणार आहे.

दरम्यान, विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह पक्षाच्या काही मंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षाची निवड याच अधिवेशनात करण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या समन्यवय बैठकीत केली होती. मात्र, आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून तेवढा प्रतिसाद काँग्रेसला मिळू शकलेला नाही. त्यामुळे याही अधिवेशनात काँग्रेसची अध्यक्ष निवडीची मागणी पूर्ण होऊ शकलेली नाही. 

नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर मागील हिवाळी आणि नुकतेच पार पडलेले पावसाळी अधिवेशन अध्यक्षांविना पार पडले आहे. विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी झिरवळ सांभाळत आहेत. काँग्रेस पक्षाकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी भोरचे आमदार संग्राम थोपटे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, आमदार सुरेश वरपुडकर यांची नावे चर्चेत होती. यासंदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता त्यांनी दिल्लीत आपण वैयक्तीक कामासाठी गेलो होते, असे सांगून त्याबाबत बोलणे टाळले होते. 

विधानसभेतील गदारोळ आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना शिवीगाळ केल्याचा ठपका ठेवून भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. त्याचवेळी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, अध्यक्षांची निवडणूक याही अधिवेशनात होऊ शकली नाही. भाजपचे सदस्य निलंबित झाल्यानंतर अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यासाठी आग्रह का धरला नाही, अशी विचारणा काँग्रेस श्रेष्ठींनी राज्यातील नेत्यांकडे केल्याचे सांगण्यात येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com