सत्तेच्या मोहात जनतेचे प्रश्न दिसत नाहीत, त्याची उत्तरे आधी द्या; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर निशाणा

राज्यात शिवसेना आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोप सुरुच असून, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट शिवसेनेच्या संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
chandrakant patil responds to sanjay raut allegations against bjp
chandrakant patil responds to sanjay raut allegations against bjp

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजप ऑक्टोबरपर्यंत पुन्हा एकदा सरकार पाडण्याचा प्रयत्न करेल, असा आरोप करण्यात आला आहे. याचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला आहे. तिन्ही पक्षांमध्ये सुरू असलेल्या भांडणामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सरकार पडण्याची भीती वाटत आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे. पाटील यांनी काही प्रश्न उपस्थित केले असून, राऊत यांनी त्यांची उत्तरे द्यावीत, असे खुले आव्हानही दिले आहे. 

चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवर आज संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा सामनामधून भाजप ऑक्टोबरपर्यंत सरकार पाडण्याचा प्रयत्न करेल असा आरोप केला आहे. मुळात राऊत तुम्हाला तिन्ही पक्षांच्या अंतर्गत चाललेल्या भांडणावरून सरकार पडण्याची भीती वाटत आहे, असे संपूर्ण महाराष्ट्राला समजते. ती भीती तुम्ही भाजपच्या नावाने बोलून दाखवत आहात. कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्र अडकला आहे त्यापेक्षा तुम्हाला भाजपवर खोटे आरोप करणे महत्वाचे वाटते का? सरकार पडण्याचा मुद्दा जास्त महत्वाचा वाटतो का? 

दिवसेंदिवस महाराष्ट्रात कोरोना त्याचे पाश आणखी घट्ट आवळत चालला आहे, कोरोनामध्ये होणारा मृत्युदर वाढतोय. राज्य सरकारचा प्रत्येक प्रयत्न हा गेल्या तीन महिन्यांपासून दिशाहीन असल्याचे संपूर्ण देशाला माहित आहे. तुमच्या सरकारी कार्यकाळात आपले पोलीस, डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी देखील असुरक्षित आहेत. शेतकऱ्यांची बियाणे आणि पुढच्या हंगामातील कर्जाची समस्या तर तुम्हाला सोडवावीशी देखील वाटत नाही. या सर्व चुकांचे आत्मपरीक्षण करून त्या सुधारायच्या सोडून तुम्ही भाजपावर निष्फळ आरोप करत आहात, असे पाटील यांनी म्हटले आहे. 

कित्येक वर्षांपासून तुमच्या हातात मुंबई महानगरपालिका आहे परंतु, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबई पहिल्या पावसात तुंबली आहे. पूर्ण शहर गेले तीन महिने रिकामे होते, योग्य नियोजन करून पावसाळ्याच्या आधी सर्व कामे तुम्ही करू शकला असता पण तसे तुम्ही केले नाही परिणामी मुंबई पुन्हा तुंबली आणि कोरोनाच्या संकटात आता आणखी वाढ झाली आहे. या सर्वांबद्दल सामना नेहमीच गप्प असतो, असा टोलाही त्यांनी लगावला. 

फक्त केंद्र सरकारच्या चीन विरुद्धच्या कारवाईवर मनाला येईल तशी टीका करणे आणि भाजप हे सरकार पाडू बघत आहे अशी विधान करणे एवढेच वाचायला मिळते. मी मांडलेल्या सगळ्या समस्यांच्या उपाययोजनांवर कधी बोलणार राऊत? सत्तेच्या मोहात तुम्हाला जनतेचे प्रश्न दिसत नाही. तुम्ही राज्य शासनाचे अपयश हे भाजपा वर आरोप करून लपवू शकत नाही. जनता सुजाण आहे. शेवटी तीच ठरवेल भविष्य, असे पाटील यांनी नमूद केले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com