सोवळ्यावर जपून बोला; नाही तर जानवेधारी राहुल गांधींना राग यायचा!  - BJP's Atul Bhatkhalkar criticizes Energy Minister Nitin Raut | Politics Marathi News - Sarkarnama

सोवळ्यावर जपून बोला; नाही तर जानवेधारी राहुल गांधींना राग यायचा! 

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

जातीच्या पलीकडेही जगात काही असते, यावर कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना बहुधा विश्‍वास नसावा. सोवळ्यावर त्यांनी जरा जपूनच बोलावे, नाही तर जानवेधारी राहुल गांधी यांना राग यायचा, असा टोला भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. 

मुंबई : "जातीच्या पलीकडेही जगात काही असते, यावर कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना बहुधा विश्‍वास नसावा. सोवळ्यावर त्यांनी जरा जपूनच बोलावे, नाही तर जानवेधारी राहुल गांधी यांना राग यायचा,' असा टोला भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. 

उत्तर प्रदेश राज्यातील आझमगड जिल्ह्यातील बासगाव येथील दलित युवा सरपंचाचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत तेथे गेले होते. मात्र, त्यांना यूपी पोलिसांनी सीमेवरच अडवून महाराष्ट्रात परत पाठविण्यात आले होते. 

त्यावर "मी उत्तर प्रदेशचा अतिथी होतो, तरीही तेथील सरकारने माझ्याशी अशा पद्धतीने व्यवहार केला. त्यावरून उत्तर प्रदेश सरकारने आपली संस्कृती काय आहे, हे दाखवून दिले आहे,' अशी टीका त्यांनी उत्तर प्रदेशमधील भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर केली होती. 

त्याला राज्यातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले होते. महाराष्ट्रातील जनता वाढीव वीजबिलांनी त्रस्त असताना ऊर्जामंत्री डॉ. राऊत हे उत्तर प्रदेशच्या राजकीय दौऱ्यावर गेले आहेत. उत्तर प्रदेशची जबाबदारी कॉंग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. त्यामुळे आपली कार्यतत्परता दाखविण्यासाठी त्यांच्यासमोर जाणे, ही ऊर्जामंत्र्यांची राजकीय गरज असल्याची टीका आमदार पाटील यांनी केली होती. 

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्याला प्रत्युत्तर देताना आमदार चंद्रकांत पाटील यांना निवडणुकीसाठी कोल्हापुरातून सुरक्षित मतदारसंघ असलेल्या पुण्यातील कोथरुडमध्ये आल्याची आठवण करून दिली होती. चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या मनातील दलितांसाठीचे प्रेम अधिक प्रदर्शित करू नये, त्यामुळे कोथरुडकर मतदारांचं सोवळं मोडेल आणि पुढच्या वेळी पुन्हा सुरक्षित मतदारसंघ शोधण्याची धावपळ करावी लागेल, असा सणसणीत टोला राऊत यांनी लगावला होता. 

त्यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्‌विट करत भाष्य केले आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की जातीच्या पलिकडेही जगात काही असते, यावर ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांना बहुधा विश्‍वास नसावा. सोवळ्यावर राऊत यांनी जरा जपूनच बोलावे, नाही तर जानवेधारी राहुल गांधी यांना राग यायचा, असा चिमटा त्यांनी राऊत यांना काढला आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या आधी राहुल गांधी यांनी एका मंदिरात गेल्यानंतर जानव्या संदर्भात वक्तव्य केले होते. त्याचा दाखला देत भातखळकर यांनी राऊत यांना सुनावले आहे. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख