काँग्रेसने अशोक चव्हाणांवर सोपवली आणखी एक महत्वाची जबाबदारी  - (Ashok Chavan's committee will analyze the defeat of Congress in the Assembly elections | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसने अशोक चव्हाणांवर सोपवली आणखी एक महत्वाची जबाबदारी 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 11 मे 2021

या जबाबदारीबद्दल अशोक चव्हाण यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आभार मानले आहेत.

मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर अखिल भारतीय काँग्रेस (Congress) कमिटीने एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. देशभरात पाच राज्यांत विधानसभेची निवडणूक (Assembly elections) झाली. या निवडणुकीत पक्षाच्या झालेल्या पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची एक समिती पक्षाने स्थापन केली आहे. ही समिती या निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाची कारणे (Reasons for defeat) शोधून त्याबाबतचा आपला अहवाल १५ दिवसांत पक्षाला सादर करणार आहे. (Ashok Chavan's committee will analyze the defeat of Congress in the Assembly elections)

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी या समितीची घोषणा केली आहे. या समितीत वरिष्ठ नेते सलमान खुर्शिद, माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी, व्हिन्सेंट पाला, खासदार ज्योती मणी हे चार सदस्य असतील. देशात नुकत्याच पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ व पुदुच्चेरी या पाच राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक झाली होती. 

हेही वाचा : पालकमंत्री भरणेंविरोधातील रोष कमी करण्यासाठी अजितदादा, जयंतराव उतरले मैदानात

या पाच राज्यांपैकी केरळ आणि पुदुच्चेरीत पक्षाला सत्ता मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, ती मिळू शकली नाही. तसेच तामिळनाडूत द्रमुक सोबतच्या आघाडीमुळे पक्षाची ताकद टिकून आहे. मात्र, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने डाव्यांसोबत आघाडी केली हेाती. त्या राज्यात पक्षाला एकही जागा निवडून आणता आलेली नाही. या पाच राज्यांत पक्षाची झालेली दारुण अवस्था याची कारणे अशोक चव्हाण यांच्या समितीला शोधावी लागणार आहेत. 

अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील ही समिती या पाचही राज्यांच्या निकालाचे विवेचन करून पुढील १५ दिवसांत आपला अहवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला सादर करणार आहे. 

या जबाबदारीबद्दल अशोक चव्हाण यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आभार मानले आहेत. या निवडणुकीच्या निकालाबाबत संबंधित राज्यांमधील काँग्रेसचे उमेदवार, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलून आपण अहवाल सादर करू, असे त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख