Amritavahini, who did not speak on Corona, spoke on Sushant Singh | Sarkarnama

कोरोनावर न बोलणाऱ्या अमृतावहिनी सुशांतसिंहवर मात्र  बोलल्या 

निवास चौगले 
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

महाराष्ट्रासह देशात आणि संबंध जगात कोरोना महामारीने कहर केला आहे. अशा परिस्थितीत समाज या गोष्टी गांभीर्याने घेणार की नाही ? की अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाची चर्चा करीत राहणार? असा उद्विग्न सवाल राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. 

कोल्हापूर : महाराष्ट्रासह देशात आणि संबंध जगात कोरोना महामारीने कहर केला आहे. अशा परिस्थितीत समाज या गोष्टी गांभीर्याने घेणार की नाही ? की अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाची चर्चा करीत राहणार? असा उद्विग्न सवाल राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. 

कोरोना विषाणूने गेली पाच महिने थैमान घातले आहे. त्यावर नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्‍टर्स, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ यासारख्या हजारो योद्धांनी अविरत व अविश्रांत मेहनत घेतली. अद्याप हा धोका कधी जाणार याची खात्री नसताना, ते संघर्ष करत आहेत. जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी मला सांगत होते की, रात्रंदिवस आम्हाला झोप नाही. एखादा फोन आला की, पोटात धस्स होते. या सर्वांवर प्रचंड तणाव आहे, असे या पत्रकात म्हटले आहे. 

राज्यातील या योद्धाचे कौतुक करत, कोरोनाचा शेवट होईपर्यंत त्यांना मानसिक आधार देण्याची गरज आहे. मात्र, दिवसेंदिवस रुग्णांच्या व मृत व्यक्तींच्या संख्येत वाढ होत आहे. अनेकांच्या संसाराचा चक्काचूर झाला. छोटे-छोटे व्यापारी, सलूनवाले, वडाप, रिक्षा, हॉटेल व्यवसायिक, शेतकरी, जीम, मॉल किती कोटी लोक संकटामध्ये सापडेल त्यांना आपण काय मदत करणार ? असा सवालही या पत्रकात उपस्थित करण्यात आला आहे. 

लग्न करण्यास बंदी, पंचवीस माणसे एकत्र जमवायची नाही. हे संकट कसले? या रोगामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी बंदी. एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक अंत्यसंस्काराला उपस्थित राहात नाहीत. दुसरे सगेसोयरे नसलेले लोक आपल्या जीवन उधारकावर अंत्यसंस्कार करत आहेत. यावर लस तयार होत असल्याच्या बातम्या येत आहेत. सन 2020 नंतर समृद्ध गतजीवन प्राप्त झाले पाहिजे.

या सर्व विचारांच्या ऐवजी गेली दोन आठवडे फक्त एक अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्या विषयीच चर्चा होताना दिसते. आत्महत्या का केली? कशासाठी केली? त्याचे किती तरुणींवर प्रेम होते? तो जीवनात यशस्वी झाला की नाही? या सगळ्याची चौकशी होईल. त्यासाठी मुंबई पोलिस सक्षम आहेत, असेही या पत्रकात मुश्रीफ यांनी म्हटले आहे. 

कोरोना महामारीबाबत एक अवाक्षरही न काढणाऱ्या आमच्या अमृतावहिनी (देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी) अवतरतात आणि एका आत्महत्येच्या तपासावरुन मुंबई सुरक्षित राहिली नाही, असे वक्तव्य करतात. हे आश्‍चर्यजनक आहे. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वर्षा बंगल्याच्या भिंतीवर लिहिलेली वाक्‍ये, मंत्री आदित्य ठाकरे यांना रेशमी किडा संबोधणे व आता मुंबई पोलिसांवर दाखविलेला अविश्वास. हे सर्व वाचून कोरोनाच्या संकटामध्ये नेमकं हे चाललंय तरी काय? हेच समजत नाही, असेही या पत्रकात म्हटले आहे. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख