बारामतीत तीस लाखांच्या व्याजासाठी युवकाचे अपहरण.... - Youth Kidnapped From Baramati for Demand of Interest Money | Politics Marathi News - Sarkarnama

बारामतीत तीस लाखांच्या व्याजासाठी युवकाचे अपहरण....

मिलिंद संगई
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

व्याजाने घेतलेले 15 लाख रुपये व त्याचे व्याज असे 30 लाख रुपये देण्यासाठी बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथील एका फॅब्रिकेशन व्यावसायिकाचे पाच जणांनी 28 नोव्हेंबर रोजी अपहरण केले होते. या अपहरण नाट्यात सुदैवाने ज्याचे अपहरण झाले त्याला कोणतीही दुखापत झाली नसून संध्याकाळी अपहरणकर्त्यांनी मोरगाव नजिक या व्यावसायिकास सोडून दिले

बारामती : व्याजाने घेतलेले 15 लाख रुपये व त्याचे व्याज असे 30 लाख रुपये देण्यासाठी बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथील एका फॅब्रिकेशन व्यावसायिकाचे पाच जणांनी 28 नोव्हेंबर रोजी अपहरण केले होते. या अपहरण नाट्यात सुदैवाने ज्याचे अपहरण झाले त्याला कोणतीही दुखापत झाली नसून संध्याकाळी अपहरणकर्त्यांनी मोरगाव नजिक या व्यावसायिकास सोडून दिल्याची माहिती बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांनी दिली. अनमोल लालासाहेब परकाळे (वय 27, रा. पाहुणेवाडी, ता. बारामती) यांचे अपहरण झाले होते. 

एखाद्या हिंदी चित्रपटात शोभावे अशा पध्दतीने हे अपहरण नाट्य घडले. शनिवारी (ता. 25) रात्री या अपहरण नाट्यास रात्री सव्वा नऊच्या सुमारास प्रारंभ झाला. आपले कुत्रे बाहेर फिरविण्यासाठी अनमोल घराबाहेर गेल्यावर काही मिनिटात त्याचे वडील लालासाहेब दौलतराव परकाळे यांना त्यांच्या मुलाच्याच फोनवरुन फोन आला. तुमच्या मुलाने माझ्याकडून 15 लाख रुपये घेतले आहेत, त्याचे व्याजासह तीस लाख रुपये उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत मी सांगेन तेथे आणून द्या आणि पोलिसांना सांगितल तर मुलाला विसरा, असा दमच अपहरण कर्त्यांनी लालासाहेब यांना दिला. आमचा व्याजाचा व्यवसाय असून ते पैसे परत करा, असा दमही त्यांनी दिला. 

मुलाचे काही बरेवाईट होऊ नये या भीतीने परकाळे दांपत्याने मुलाच्या अपहरणाची तक्रार पोलिसात केलीच नाही. रविवारी दुपारी दोन वाजता अनमोल याच्याच फोनवरुन पैशांची सोय झाली का असा विचारणा करणारा फोन आला. लालासाहेब यांनी आपल्याकडे आता दोन लाख रुपये आहेत, असे त्याला सांगितल्यावर पूर्ण पैशांची सोय करा नाहीतर मुलाला विसरा, असा दम पुन्हा त्यांना दिला गेला. 

तासाभराने पुन्हा अपहरणकर्त्यांनी सहा लाख रुपये रोख व दोन कोरे चेक द्यावे लागतील, असे सांगितले. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मोरगाव रस्त्याने जेजुरीत पैसे घेऊन या, असा फोन आला. का-हाटी येथे असताना पुन्हा अपहरणकर्त्यांनी मोरगाव येथे लालासाहेबांना बोलावले. पुन्हा त्यांना नीरा रस्त्याने नीरेकडे या असा निरोप मिळाला. मात्र लालासाहेबांना अपहरणकर्त्यांनी विचारणा केली की तुमच्या गाड्यांच्या मागे पोलिसांच्या गाड्या आहेत काय...मात्र पोलिसांचा व गाड्यांचा संबंध नाही असे सांगितल्यावर पुन्हा त्यांना मोरगावकडे येण्यास सांगितले. तेते पेट्रोलपंपावर थांबण्यास सांगितल्यावर पुन्हा नीरा बाजूकडे गाडी आणण्यास सांगितले गेले. गुळुंचे येथे असतानाच लालासाहेब यांना अनमोलचाच पोन आला की त्याला मोरगाव जेजुरी रस्त्यावरील श्रीसृष्टी धाब्यानजिक अपहरणकर्त्यांनी सोडले आहे. 

त्या नंतर पोलिसांनी अनमोल यास ताब्यात घेत त्याच्याकडे कसून चौकशी केली. सुदैवाने अनमोल यास अपहरणकर्त्यांनी कोणतीही दुखापत केली नव्हती. लालासाहेब यांनी पोलिसांना कळवले नसले तरी पोलिसांना या अपहरणनाट्याची कुणकुण लागली होती व पोलिसांनीही समांतर पाठलाग सुरु केला होता. मात्र अपहरणकर्त्यांनाही पोलिसांचा सुगावा लागल्याने त्यांनी अनमोलला रस्त्यात सोडून पळ काढला. 

उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांच्यासह अनेक पोलिस कर्मचारी या ऑपरेशनमध्ये सहभागी होते. सुदैवाने या अपहरणनाट्यात अनमोलला दुखापत न झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.
पोलिसांनी या पाचही अपहरणकर्त्यांचा तपास सुरु केला आहे. 

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख