While BJP leader was pouring milk on the road, Sharad Pawar was in the dairy | Sarkarnama

भाजप नेते रस्त्यावर दूध ओतत असताना शरद पवार मात्र डेअरीत

डी. के. वळसे पाटील
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

केंद्रात सलग दुसऱ्या वेळी सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाचे राज्यातील नेते हे दूध भुकटी निर्यातीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करण्याऐवजी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार मात्र मंचर (ता आंबेगाव, जि. पुणे) येथे गोवर्धन दूध प्रकल्प व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भाग्यलक्ष्मी डेअरी प्रकल्पास भेट देऊन दूध धंद्यातील अडचणी समजून घेत होते. त्यातून मार्ग काढण्याचे सांगून परिसरातील शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते. 

मंचर  (जि. पुणे)  ः केंद्रात सलग दुसऱ्या वेळी सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाचे राज्यातील नेते हे दूध भुकटी निर्यातीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करण्याऐवजी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार मात्र मंचर (ता आंबेगाव, जि. पुणे) येथे गोवर्धन दूध प्रकल्प व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भाग्यलक्ष्मी डेअरी प्रकल्पास भेट देऊन दूध धंद्यातील अडचणी समजून घेत होते. त्यातून मार्ग काढण्याचे सांगून परिसरातील शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते. 

दुधाला तीस रुपये प्रतिलिटर भाव तसेच १० रुपये अनुदान तर दूध भुकटी निर्यातीसाठी प्रतिकिलो ५० रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी महायुतीच्या वतीने शनिवारी (ता. १ ऑगस्ट) संपूर्ण राज्यभरात दूध दरवाढ आंदोलन करण्यात आले. या वेळी नेहमीप्रमाणे आरोप-प्रत्यारोप झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना हे आंदोलन म्हणजे भाजपचे शेतकऱ्यांप्रति पुतनामावशीच्या प्रेमासारखे असल्याची टीका केली आहे. 

हे एकीकडे सुरू असताना शरद पवार मात्र नेहमीप्रमाणे ग्राउंड लेव्हल जाऊन काम करण्याच्या त्यांच्या पद्धतीप्रमाणे आजही त्यांनी शेतकऱ्यांच्या गोठ्याला भेट देऊन दूध धंद्याबाबतच्या अडचणी जाणून घेऊन त्याबाबत शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. भाग्यलक्ष्मी डेअरी प्रकल्पात  तीन हजार २०० संकरीत गायी असून मानवाचा स्पर्श न होता दूध काढणी ते पॅकिंगपर्यंतच्या तसेच दुग्धजन्य निर्मिती प्रकल्पाची पाहणी पवार यांनी केली. 

पवार म्हणाले की भारत हा जगात दूध उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे. लवकरच आपण दुप्पट दुध उत्पादन वाढविणार आहे. जगाचे दुधाचे मार्केट काबीज केले पाहिजे. प्रति गाय दुधाचे उत्पादन २० ते २५ लिटर झाले पाहिजे. दूध उत्पादक शेतकऱ्यावर दूध दरवाढीसाठी आंदोलनाची वेळ येऊ नये, यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

अल्फा हा पौष्टिक हिरवा चार आयात केल्यास येथील शेतकऱ्यांना बाराही महिने चारा उपलब्ध होईल. दररोज पौष्टिक चारा मिळाल्यास गायीचे दूध उत्पादन वाढीचे उद्दिष्ठ साध्य करता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पवार म्हणाले, बारामती येथे संकरीत गायांवर संशोधन करणारे सेन्ट्रल ऑफ एक्सनल केंद्र कार्यान्वित केले आहे. केंद्रात संकरीत गायी, दूध उत्पादन वाढ, डेअरी उद्योगाबाबत शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन व्हावे, असे केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे.

शहा यांच्या भाग्यलक्ष्मी प्रकल्पाची ख्याती ऐकून होतो. प्रकल्प पाहून आनंद झाला. कारण या प्रकल्पाने पश्चिम महाराष्ट्रातील अनेक दूध प्रकल्प व दूध उत्पादक शेतकऱ्यांना संजीवनी देण्याचे काम केले आहे. सध्या शेतकऱ्यांकडे असलेल्या संकरीत गायीला ८ ते १० लिटर दूध निघते. गायीला फक्त ३० टक्केच हिरवा चारा दिला जातो, त्याऐवजी ७०  टक्के हिरवा आणि ३० टक्के सुका चारा मिळाला पाहिजे. हा चार आयात करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. तो वाजवी दारात येथील शेतकऱ्यांना बाराही महिने मिळू शकेल.

दूध उत्पादन वाढल्यास दूध उत्पादक शेतकरी स्पर्धेत टिकून राहतील. त्यासाठी दूध उत्पादन वाढीसाठी लक्ष केंद्रित केले जाईल. कारण शेतीला दूध व्यावसाय पूरक  आहे. 

या वेळी त्यांसोबत राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील होते. गोवर्धन दूध प्रकल्पाचे अध्यक्ष देवेंद्र शहा व व कार्यकारी संचालक प्रीतम शहा यांनी प्रकल्पाची माहिती देऊन दूध व्यवसायातील समस्या सांगितल्या.

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज) अध्यक्ष विष्णू हिंगे, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पंचायत समिती सभापती संजय गवारी, दत्तात्रय थोरात, नंदकुमार सोनवले हेही या वेळी उपस्थित होते. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख