Warkari Sangh from Pune filed a petition in the court for Wakhri to Pandharpur Wari | Sarkarnama

वाखरी ते पंढरपूर वारीसाठी पुण्यातील वारकरी संघ कोर्टात 

सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 29 जून 2020

वाखरी ते पंढरपूर अशी छोटी वारी करण्यासाठी वारकऱ्यांनी थेट न्यायालयालाच साकडे घातले आहे. पुण्यातील वारकरी सेवा संघाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मंगळवारी (ता. 30 जून) सुनावणी होणार आहे. 

मुंबई : राज्यात कोरोनाचा धोका वाढत असताना यंदा सण आणि उत्सवांवरही याचा परिणाम झाला आहे. पंढरपूरची आषाढी वारी आणि पायी पालखी सोहळाही राज्य सरकारकडून रद्द करण्यात आला आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर वाखरी ते पंढरपूर अशी छोटी वारी करण्यासाठी वारकऱ्यांनी थेट न्यायालयालाच साकडे घातले आहे. पुण्यातील वारकरी सेवा संघाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मंगळवारी (ता. 30 जून) सुनावणी होणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच जगन्नाथ पुरी रथयात्रेला सशर्त परवानगी दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर जगन्नाथ पुरी रथ यात्रेला जर परवानगी मिळत असेल तर वारीलाही त्याच निकषांवर परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका पुण्यातील वारकरी सेवा संघाकडून ऍड मिहीर गोविलकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. काही अटी आणि शर्तींसह वारीलाही परवानगी द्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. 

वारीला सुमारे आठशे वर्षांची परंपरा आहे आणि आतापर्यंत एकदाही वारी खंडित झालेली नाही. यंदा मात्र कोव्हिड 19 च्या संसर्गामुळे वारीवर सरकारने निर्बंध आणले आहेत. आता शेवटच्या टप्प्यात संत ज्ञानेश्‍वर माउलींच्या पादुका वाखरी ते पंढरपूर हे सहा किलोमीटर अंतर पायी वारी करून नेण्याची शंभर वारकऱ्यांना परवानगी द्यावी, अशी विनवणी केली आहे. तसेच, चंद्रभागा नदीमध्ये स्नान, नगरप्रदक्षिणा करण्याची परवानगीही याचिकेमध्ये मागण्यात आली आहे. 

याचिकेवर मंगळवारी (ता. 30 जून) उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यात वारीची प्राचीन परंपरा आहे. यंदा वारी कोरोनामुळे निघाली नाही. मात्र, संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये नेण्यात येणार आहेत, असे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. 

आषाढीला हा वारकरी करणार मुख्यमंत्र्यांबरोबर विठ्ठलाची महापूजा 

आळंदी (पुणे) : आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या महापूजेचा मान मुख्यमंत्र्यांबरोबर दरवर्षी वारकऱ्याला मिळत असतो. यंदा कोरोनाच्या लॉकडाउनमुळे वारकऱ्यांसाठी मंदिर बंद असणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शासकीय महापूजा करण्याचा मान यंदा मंदिरात पहारा देणारे विणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे यांना मिळणार आहे. मंदिरातील सहा विणेकऱ्यांपैकी एकाची चिठ्ठीद्वारे निवड करून मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. 

पालखीचा पायी वारी सोहळा यंदाच्या वर्षी कोरोनामुळे राज्य सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे या वर्षी लाखोंची गर्दीही नाही आणि दर्शनासाठीची भली मोठी रांगही नसणार आहे.

यंदाच्या वर्षी वारकऱ्यांना तासन्‌तास रांगेत ताटळकत थांबवे लागणार नाही. पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात परंपरेने होणारी आषाढी एकादशीची (ता. 1 जुलै) पहाटे सव्वा दोनची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. 

मुख्यमंत्र्यांसमेवत विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी दरवर्षी दर्शनाच्या रांगेतील वारकरी निवडला जातो. मात्र, या वर्षी वारीच रद्द करण्यात आल्याने मानाचा वारकरी कोण याकडे वारकरी संप्रदायाचे लक्ष लागले होते. त्यातच श्री पांडुरंगाचे मंदिरही दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.

त्यामुळे विठ्ठल रूक्‍मिणी मंदिरात चोविस तास पहारा देणाऱ्या सहा विणेकऱ्यांची नावे लिहून चिठ्ठ्या टाकण्याचा निर्णय झाला. त्यानुसार चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. त्या चिठ्ठ्यांमध्ये विणेकरी विठ्ठल बढे यांना शासकीय महापुजेसाठी मानाचा वारकरी म्हणून मंदिर समितीने घेतलेल्या बैठकीत संधी देण्याचे ठरविण्यात आले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख